काँग्रेसशासित राज्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर असंतोष असून पंतप्रधानांनी धमक असेल तर कर्नाटकबरोबरच मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, राजस्थान आणि दिल्ली विधानसभांच्या निवडणुका तसेच लोकसभेची निवडणूकही एकाच वेळी घेऊन दाखवावी, असे आव्हान भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी येथे एका जाहीर सभेत दिले.
कर्नाटकात भाजपकडून काही चुका जरूर झाल्या. पण त्यांचे निवारण आता झाले आहे, असा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान मनमोहन सिंग हे प्रचारानिमित्त मंगळवारीच हुबळीत असल्याने अडवाणी यांनी त्यांना हे आव्हान देत काँग्रेसवर टीका केली.
मनमोहन सिंग यांच्याइतका दुबळा पंतप्रधान मी पाहिला नाही, अशी टीका करीत ते म्हणाले, खरे तर राज्यघटनेने पंतप्रधानांना इतके व्यापक अधिकार बहाल केले आहेत की त्यायोगे खंबीरपणे कित्येक निर्णय घेऊन परिवर्तन साधता येईल. पण सिंग प्रत्येक निर्णय ‘१० जनपथ’ला विचारून घेतात.