तालिबान अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अनेक फतवे काढत आहे. महिलांसंदर्भात तालिबानची भूमिका नेहमी संशयास्पद राहिली आहे. तालिबाने यापुर्वी अनेक महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काल काबूलमध्ये पाकिस्तान विरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांवर तालिबानने हवेत गोळीबार केल्याची माहिती देखील एएफपीने दिली होती. दरम्यान, पुन्हा एकदा तालिबाने महिलांसंदर्भात धक्कादायक निर्णय घेतला आहे. तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे उपप्रमुख अहमदुल्लाह वासिक यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

तालिबान राजवाटीत अफगाणिस्तानमध्ये महिलांना प्रवासास, घराबाहेर पडण्यास बंदी आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी लेखल्या जाते. तेथे महिलांवर होणाऱ्या अत्याचाबाबत जागतिक महिला आयोगाने देखील चिंता व्यक्त केली आहे. महिलांचे स्वतंत्र नष्ट करणारा आणखी एक निर्णय तालिबानने घेतला आहे.

तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे उपप्रमुख अहमदुल्लाह वासिक यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमधील महिलांना क्रिकेट सहित अन्य खेळांमध्ये भाग घेता येणार नाही. अहमदुल्लाह वासिक यांनी स्थानिक माध्यामांशी संवाद साधतांना ही माहिती दिली. यासाठी त्यांनी धक्कादायक कारण देखील सांगितले आहे. अहमदुल्लाह वासिक म्हणाले, महिलांना खेळांमध्ये भाग घेण्याची गरज नाही. कारण यामुळे त्यांचे शरीर माध्यमांसमोर येईल.

हेही वाचा- डोक्यात गोळ्या झाडल्या, नंतर डोळे काढले; अफगाणी महिलेने सांगितला थरारक अनुभव

महिला विद्यार्थ्यांना फक्त महिलांनीच शिकवावं

खासगी अफगाणी विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या स्त्रियांनी अबायाचा झगा आणि चेहऱ्याचा बहुतेक भाग झाकणे आणि निकाब घालणे आवश्यक आहे, असे आदेश तालिबानने सत्तेत आल्यानंतर दिले होते. तसेच वर्ग लैंगिकतेनुसार वेगवेगळे केले पाहिजेत किंवा पडद्याने विभागले गेले पाहिजे, असेही म्हटले होते. अलिकडच्या काही वर्षांमध्ये अफगाणिस्तानमध्ये बुरखा आणि निकाब घालण्याचं प्रमाण कमी झालं होतं. मात्र, तालिबानच्या येण्याने ते लहान गावांसहित शहरांमध्ये पुन्हा दिसू लागले आहेत.

हेही वाचा – केवळ महिलाच नाही तर विद्यापीठांमधील वर्गही पडद्याआडच; समोर आले तालिबान राजवटीतील क्लासरुमचे फोटो

तालिबानच्या शिक्षण प्राधिकरणाने जारी केलेल्या एका आदेशात म्हटलंय की, “महिला विद्यार्थ्यांना फक्त महिलांनीच शिकवावं. परंतु जर ते शक्य नसेल तर चांगली वर्तणूक असलेले वृद्ध पुरूष या महिलांना शिकवू शकतात. विद्यापीठांनी महिला विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सुविधांच्या आधारे महिला शिक्षकांची भरती करणे आवश्यक आहे. जर महिला शिक्षकांची नेमणूक करणे शक्य नसेल, तर महाविद्यालयांनी आतापर्यंत चांगली वर्तणूक राहिलेल्या वृद्ध पुरुष शिक्षकांची नेमणूक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे”, यासंदर्भात एएफपीने वृत्त दिले होते.