केरळच्या पलक्कड जिल्ह्यात गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खायला देण्यात आल्यामुळे तिचा मृत्यू झाला. प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियामध्ये ही बातमी आल्यानंतर सर्वच स्तरातून रोष व्यक्त केला जातो आहे. केरळ सरकारने या प्रकरणी तात्काळ पावलं उचलत एका व्यक्तीला अटकही केली आहे. हे प्रकरण ताज असतानाच हिमाचल प्रदेशमध्ये बिलासपूर जिल्ह्यात गर्भवती गाईला खाण्यामधून स्फोटकं देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पावलं उचलत, गुन्ह्याची नोंद केली आहे.

गाईच्या मालकाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या व्हिडीओत गाईच्या जबड्याला जबर दुखापत झाल्याचं दिसून येत आहे. तसंच तिच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. गुर्दील सिंह असं या गाईच्या मालकाने या प्रकारासाठी आपला शेजारी नंदलालवर आरोप केला आहे. हा प्रकार केल्यानंतर नंदलाल फरार झाल्याचंही गाईच्या मालकाने व्हिडीओत सांगितलं आहे. बिलासपूरच्या जनदुत्ता भागात हा प्रकार घडल्याचं बोललं जातंय.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही या प्रकरणाची दखल घेतली असून, राज्यात असे प्रकार कादापी खपवून घेतले जाणार नाहीत असं स्पष्ट केलंय. पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन जयराम ठाकूर यांनी दिलं आहे.