News Flash

राजनाथ सिंह यांच्या दूरध्वनीनंतर महावीरांची मूर्ती सापडली

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मूर्ती सापडवल्याबद्दल बिहार पोलिसांचे कौतुक केले आहे.

| December 7, 2015 02:20 am

राजनाथ सिंह

नितीशकुमार यांच्याकडून पोलिसांचे कौतुक
भगवान महावीरांची २६०० वर्षांपूर्वीची अमूल्य मूर्ती नऊ दिवसांपूर्वी बिहारमधील जामुई जिल्ह्य़ातील खेडय़ातून चोरीस गेली होती ती सापडली आहे. ही मूर्ती ताबडतोब शोधली जावी यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दूरध्वनी केला होता. अडीचशे किलोची ही मूर्ती आहे.
जामुई येथून पोलीस महानिरीक्षक बच्चूसिंग मीणा यांनी सांगितले की, आज सकाळी सहा वाजता आम्हाला ही मूर्ती सापडली आहे. बच्चूसिंग हे मूर्ती शोधण्यासाठी आठवडाभर जामुई येथे तळ ठोकून होते. त्यांनी व्यक्तीगत पातळीवर तपासाची देखरेख ठेवली. ज्या टोळीने मूर्ती चोरली होती त्यांच्यातील एकाने पोलिसांना दूरध्वनी करून ती मूर्ती बिछवे खेडय़ातील शेतात पडली आहे अशी माहिती दिली. पोलिसांनी आज सकाळी ही मूर्ती तेथून ताब्यात घेतली.
मीणा यांनी सांगितले की, चोरटय़ांनी मूर्ती विकण्याचे ठरवले होते, पण चौकशीच्या दबावामुळे ते तसे करू शकले नाहीत, त्यामुळे त्यांनी ती मूर्ती शेतात टाकून दिली. या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. त्या टोळीविरोधात कुठलेही पुरावे नाहीत. ही मूर्ती काळ्या पाषाणाची असून ती जामुई जिल्ह्य़ातील जैन मंदिरातून २७ नोव्हेंबरला चोरीस गेली होती. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी त्याबाबत मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दूरध्वनी करून तपासातील प्रगतीची माहिती घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी अगोदर या प्रकरणी चौकशीसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमली होती, नंतर त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मूर्ती सापडवल्याबद्दल बिहार पोलिसांचे कौतुक केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 2:20 am

Web Title: after rajnath singhs phone the idol of mahavir found
टॅग : Rajnath Singh
Next Stories
1 काँग्रेस नेते टायटलर यांच्यावर हल्ला
2 चीनमध्ये बीजिंगसह काही भागात पुन्हा काळ्या धुक्याचा इशारा
3 छत्तीसगडमध्ये शस्त्रसाठा जप्त
Just Now!
X