जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा एका तरुणाचं अपहरण केलं आहे. सुहेल अहमद गनाई असं अपहरण केलेल्या तरुणाचं नाव असून शोपियान जिल्ह्यातील मिमंदर गावातून आज (रविवारी) सकाळी त्याचं अपहरण करण्यात आल्याची माहिती आहे.

यापूर्वी शनिवारी दुपारी शोपियान जिल्ह्यातच दहशतवाद्यांनी तीन युवकांचं अपहरण करुन एकाची हत्या केली होती आणि अन्य दोघांना सोडून देण्यात आले होते. तसंच शुक्रवारी पुलवामाच्या निकलोरा परिसरातून दहशतवाद्यांनी नदीम मंझूर नावाच्या एका विद्यार्थ्याची हत्या केली होती. गेल्या तीन दिवसात तिसऱ्यांदा दहशतवाद्यांनी तरुणाचं अपहरण केलं आहे.

शनिवारी दुपारी शोपियान जिल्ह्यातून तीन तरुणांचं दहशतवाद्यांनी अपहरण केलं होतं. त्यातील एका तरुणाची गळा चिरुन निर्घुण हत्या करण्यात आली, तर अन्य दोघांना सोडून देण्यात आले होते. तर, पुलवामाच्या निकलोरा परिसरातून 11 वीत शिकणाऱ्या नदीम मंझूर याचं अपहरण करुन हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी सापडला. त्याच्यावर दहशतवादी गोळ्या झाडत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने त्याच्या हत्येची जबाबदारी घेतली आणि स्वतःच हा व्हिडीओ व्हायरल केला. व्हिडीओबरोबर हिज्बुलचा म्होरक्‍या रियाझ नायकू याचा ऑडिओ संदेशही जारी करण्यात आला. त्यात रियाझने मंझूरच्या हत्येचे समर्थन केले आहे.