सीबीआयवर तीव्र टीका करणाऱ्या भाजपवरच आता काँग्रेसने हल्ला चढविला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना पत्र पाठविण्यात आल्याच्या प्रकाराची अमेरिकेच्या ‘एफबीआय’ या गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी भाजप करू शकते, कारण भाजपचा भारतीय संस्थेवर विश्वास राहिलेला नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.
खासदारांच्या पत्रावर भारतात सह्य़ा करण्यात आल्या आणि त्याचा वापर अमेरिकेत करण्यात आला. सीबीआयवर विश्वास नसल्याने भाजप आता या प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करण्याची विनंती ओबामा यांना करू शकते, असे काँग्रेसचे नेते शकील अहमद यांनी ट्विट केले आहे.
गुजरातमध्ये २००२ मध्ये उसळलेल्या दंगलींमुळे इंडियन मुजाहिदीनचा जन्म झाला, असे विधान करून अहमद यांनी गेल्या आठवडय़ात नव्या वादाला तोंड फोडले होते. इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणावरून भाजपने, सरकार सीबीआयचा गैरवापर करीत असल्याचा आरोप अलीकडेच केला होता. शकील अहमद हे सध्या लंडनमध्ये आहेत.
ओबामा यांना पाठविण्यात आलेल्या पत्राचा काँग्रेसने निषेध अथवा समर्थन केलेले नाही, त्या पत्रावर ज्यांच्या सह्य़ा आहेत ते भाष्य करतील, असे मत व्यक्त करून काँग्रेसने याबाबत दूर राहणे पसंत केले असतानाच अहमद यांनी ट्विट केले आहे.