जगभरात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असून काही देशांमध्ये तो वेगाने पसरू लागला आहे. भारतामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये दररोज ३ लाखांहून जास्त करोनाबाधित सापडत आहेत. त्यामुळे जगभरातून चिंता व्यक्त होत असतानाच काही देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांवर काही दिवसांसाठी बंदी घातली आहे. नुकतीच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारतातून येणाऱ्या सर्व प्रवासी विमानांवर १५ मेपर्यंत बंदी घातली आहे. मात्र, हा निर्णय लागू होण्याआधीच दिल्ली-सिडनी-दिल्ली अशी सेवा देणारं एक विमान चक्क ऑस्ट्रेलियाहून रिकामंच परतलं आहे. फक्त कार्गो घेऊन परतलेल्या या विमानात फक्त क्रू मेंबर्स होते. ऑस्ट्रेलियन प्रशासनाने एकाही प्रवाशाला या विमानाच चढू दिलं नाही! पण नेमकं असं झालं तरी काय?

Corona: लष्कराचा वापर करणार आहात का?; सुप्रीम कोर्टाची केंद्राला विचारणा

विमानातून फक्त क्रू मेंबर्स परतले!

टाईम्स ऑफ इंडियानं सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचं बोईंग ७८७ ड्रीमलायनर हे विमान रविवारी दिल्ली-सिडनी-दिल्ली अशी सेवा देण्यासाठी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघालं. उड्डाणापूर्वी विमानातल्या सर्व क्रू मेंबर्सची करोना RT-PCR चाचणी करण्यात आली होती. सगळ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. मात्र, सिडनीला विमान उतरल्यानंतर स्थानिक प्रशासनाने केलेल्या चाचण्यांमध्ये एका क्रू मेंबरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने संबंधित क्रू मेंबरला तिथेच सिडनीमध्ये क्वारंटाईन करून घेतलं.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑस्ट्रेलियानं भारतातून येणारी प्रवासी विमानं १५ मेपर्यंत केली रद्द!

विमानात होता फक्त कार्गो लोड!

पण हे इतक्यावरच थांबलं नाही. विमानातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यामुळे स्थानिक प्रशासनाने कोणत्याही प्रवाशाला विमानात चढण्यापासून मज्जाव केला. शेवटी कोणताही पर्याय शिल्लक राहिला नसल्यामुळे फक्त कार्गो लोड घेऊनच एकाही प्रवाशाशिवाय हे विमान सोमवारी दिल्लीला परतलं. ऑस्ट्रेलियाच्या नियमांनुसार, क्रू मेंबर पॉझिटिव्ह आढळल्यामुळे त्याला सिडनीमध्येच क्वारंटाईन करण्यात आलं असून विमान फक्त कार्गोसह एकाही प्रवाशाशिवाय परत पाठवण्यात आलं.