चीनमध्ये वुहान शहरात करोना विषाणूचा प्रसार जोरात असतानाच तेथे अडकून पडलेल्या २५० भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी मुंबईत एअर इंडियाने ४२३ आसनांचे खास विमान सज्ज ठेवले आहे.

अधिकृत सूत्रांनी मंगळवारी सांगितले की, भारतीय नागरिकांना करोनाग्रस्त वुहान येथून भारतात आणण्यासाठी हे खास विमान रवाना करण्याकरिता आम्ही परराष्ट्र मंत्रालय व आरोग्य मंत्रालय यांच्या परवानगीची वाट पाहात आहोत. सरकारने विविध मंत्रालयांना प्राप्त परिस्थिती हाताळण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही बोईंग ७४७-४० विमान मुंबईत सज्ज ठेवले असून परवानगी मिळताच ते चीनला रवाना होईल. तेथे २५० भारतीय अडकून पडले आहेत त्यांची सुटका करून भारतात आणले जाईल. सोमवारी मंत्रिमंडळ सचिवांनी बैठक घेतली असून त्यात वुहान येथील भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे ठरले आहे.

करोना विषाणूचा प्रसार झाल्याने चीनमध्ये भीतीचे वातावरण असून यापूर्वी चीनमध्ये सार्सने ३४९ व हाँगकाँगमध्ये २९९ लोक २००२-०३ मध्ये मरण पावले होते.आता भारतीय परराष्ट्र मंत्रालय चीन सरकारला विनंती करून भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी परवानगी मागणार आहे. यात बहुतांश भारतीय विद्यार्थी असून ते वुहान शहरात आहेत. त्यांना भारतात आणल्यानंतर लगेच वेगळे ठेवण्याची व्यवस्थाही आरोग्य मंत्रालयाला करावी लागणार आहे. चीनमध्ये वुहानसह एकूण १२ शहरे चिनी अधिकाऱ्यांनी विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी बंद केली आहेत.

भारतीयांना परत आणण्यासाठी नियोजन : जयशंकर

करोना विषाणूने चीनमध्ये शंभरहून अधिक बळी घेतले असतानाच वुहान येथे काही भारतीय लोकही अडकून पडले आहेत त्यात बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना तेथून परत आणण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.  भारतीय दूतावास चीन सरकारच्या संपर्कात असून वुहानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी विमान पाठवण्यात येणार आहे. त्यांना परत आणण्यासाठी काही दिवस लागतील पण लोकांनी यात सरकारवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आतापर्यंत एकाही भारतीय विद्यार्थ्यांला या विषाणूची लागण झालेली नसून पालकांनी काळजी करण्याचे कारण नाही.  एकूण अडीचशे  विद्यार्थी हुबेई प्रांतातील वुहान येथे अडकून पडले असून त्यांना परत आणल्यानंतर १४ दिवस वेगळे ठेवावे लागणार आहे.