अखिल भारतीय आखाडा परिषदेने देशभरातील भोंदू बाबांची तिसरी यादी शुक्रवारी (१६ मार्च) जाहीर केली. या यादीत दोन प्रसिद्ध नावांचा समावेश आहे. यामध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी तर कल्कि फाऊंडेशनचे संस्थापक आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या नावाचा समावेश आहे.

आखाडा परिषदेने स्वामी चक्रपाणी आणि आचार्य कृष्णम यांच्या यादीतील नावाबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, हे दोन्ही बाबा कुठल्याही संन्याशी परंपरेतून आलेले नाहीत. तसेच आखाडा परिषदेच्या या बैठकीत कुंभमेळ्यासंबंधी देखील काही प्रस्ताव मान्य करण्यात आले आहेत. टाइम्स नाऊने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

दरम्यान, आपल्या बचावासंदर्भात बोलताना स्वामी चक्रपाणी यांनी आखाडा परिषद आणि त्यांचे महंत नरेंद्र गिरी यांच्यावर पलटवार केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आखाडा परिषद आणि त्यांचे संत लोकच भोंदू आहेत. ज्यावेळी आखाडा परिषदेने भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर केली होती त्याचवेळी मी आखाडा परिषदेचे नरेंद्र गिरी महाराज यांना भोंदू असल्याचे म्हटले होते. आखाडा परिषद आणि त्यांची बनावट संस्था नोंदणीकृत नाही. एखादी व्यक्ती जेव्हा वेडी होते तेव्हा ती व्यक्ती कुणालाही काहीही म्हणू शकते, अशा शब्दांत चक्रपाणी यांनी आखाडा परिषदेवर शरसंधान साधले. त्याचबरोबर कृष्णम हे संभलपीठाचे पीठाधिकारी आहेत. त्यांनी २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणुकही लढवली होती.

गेल्या वर्षी आखाडा परिषदेने १४ भोंदू बाबांची यादी जाहीर केली होती. यामध्ये आसाराम बापू, राधे माँ, सच्चिदानंद गिरी, गुरमीत राम रहिम, निर्मल बाबा, इच्छाधारी भीमानंद, असीमानंद, नारायण साई, रामपाल आचार्य कुशमुनी, बृहस्पती गिरी आणि मलखान सिंह या बाबांच्या नावांचा समावेश होता.