अल-कायदाचा येमेनमधील प्रमुख आणि दुसऱ्या फळीतील म्होरक्या अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्याने ओसामा बिन लादेननंतर जिहादी संघटनेला बसलेला हा दुसरा मोठा हादरा असल्याचे मानले जात आहे. इसिस या प्रतिस्पर्धी जिहादी संघटनेच्या उदयामुळे अल-कायदा खचलेला असतानाच गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे अनेक कमांडर ठार झाल्याने सदर जिहादी संघटना पुरती बिथरली आहे. एका व्हिडीओ फितीद्वारे अरबी द्वीपकल्पातील अल-कायदाने नासिर अल-वुहायशी ठार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्याद्वारे वुहायशी आणि अन्य दोन मुजाहिदीनांना लक्ष्य करण्यात आले. त्यामध्ये ते ठार झाले, असे अल-कायदाचा प्रमुख दहशतवादी खलिद ओमर बतर्फी याने जाहीर केले.
पॅरिसमधील चार्ली हेब्दोवर करण्यात आलेल्या हल्ल्यासह अरबी द्वीपकल्पातील अल-कायदाने अनेक ठिकाणांना लक्ष्य केले होते. वुहायशी ठार झाल्याने आता अल-कायदाचा लष्करप्रमुख कासीम अल-रिमी याची नवा म्होरक्या म्हणून निवड करण्यात आली आहे. सीआयएच्या ड्रोन हल्ल्यात ९ जून रोजी वुहायशी ठार झाल्याची खातरजमा अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत होती. येमेनच्या दक्षिण-पूर्वेकडील मुकल्ला येथे करण्यात आलेल्या हल्ल्यात वुहायशी ठार झाल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी एएफपीला सांगितले.