भारतात विद्यार्थ्यांनी परीक्षांमध्ये कॉपी करण्याच्या किंवा पेपरफुटीच्या बातम्या येणं म्हणजे अगदी सामान्य गोष्ट आहे. पण दुसरीकडे एक असाही देश आहे जिथे विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून रोखण्यासाठी संपूर्ण देशातच इंटरनेट बंद करण्यात आलं.

अल्जेरियामध्ये बुधवारपासून हायस्कुलच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांना सुरूवात झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी येथे कॉपीबहाद्दरांना रोखण्यासाठी इंटरनेट बंद करण्यात आलं. एकूण दोन तासांच्या परीक्षेसाठी संपूर्ण देशात मोबाइल आणि फिक्स्ड इंटरनेटची सेवा ठप्प होती. सरकारच्या आदेशानंतरच इंटरनेट सेवा रोखण्याचा निर्णय झाला असं अल्जिरी टेलिकॉमने सांगितलं.

जोपर्यंत हायस्कुलच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू राहतील तोपर्यंत ७ लाख विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून रोखण्यासाठी इंटरनेट येथे बंद असणार आहे. सोमवारपर्यंत या परीक्षा सुरू असतील. वर्ष २०१६ मध्ये येथे परीक्षेदरम्यान मोठ्या प्रमाणात कॉपी करण्यात आली होती. त्यावेळी परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न परीक्षेच्या आधीच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. त्यानंतर गेल्यावर्षी सरकारने परीक्षेदरम्यान सोशल मीडियावर प्रतिबंध घालण्यास ऑपरेटर्सना सांगितलं होतं पण त्यानेही समस्येप पूर्णपणे तोडगा निघाला नाही. अखेर यंदा संपूर्ण देशातच इंटरनेट बंद करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.