पश्चिम बंगालमधील नंदीग्राम मतदारसंघात विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्यावेळी मतदान केंद्रावर बाहेरील व्यक्ती उपस्थित होत्या, हा मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार ममता बॅनर्जी यांनी केलेला आरोप तथ्यहीन असल्याचे निवडणूक आयोगाने  स्पष्ट केले.

ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपने त्यांचेच एकेकाळचे उजवे हात सुवेंदु अधिकारी यांना उमेदवारी दिली आहे. शनिवारी निवडणूक आयोगाचे महासचिव उमेश सिन्हा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले होते, की नंदीग्राम येथील मतदान केंद्रावर बाहेरच्या व्यक्ती उपस्थित होत्या असा जो आरोप आपण केला आहे तो तथ्यहीन आहे. १ एप्रिल रोजी असा प्रकार घडला असेल तर लोकप्रतिनिधित्व कायदा कलम १३१ व कलम १२३ (२) अन्वये कारवाई केली गेली असती, पण निवडणूक आचारसंहिता व नियमांचा कुठलाही भंग झालेला दिसून आला नाही.  आम्ही प्रत्यक्ष तपासणी केली असता मतदान केंद्रावर बाहेरील व्यक्ती असल्याचा आरोप तथ्यहीन ठरला आहे.

कलम १३१ हे मतदान केंद्रांच्या ठिकाणी जाऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याशी संबंधित आहे, तर कलम १२३ (२) हे मतदारांना धमकावणे व उमेदवाराच्या वतीने हस्तक्षेप करण्याशी संबंधित आहे. निवडणुकीत मतदानाचा हक्क मुक्तपणे कुणाच्या दबावाशिवाय बजावला जावा असे अपेक्षित असते. त्यासाठी ही कलमे लोकप्रतिनिधित्व कायद्यात आहेत. निवडणूक आयोगाच्या महासचिवांनी हे पत्र  मुख्यमंत्री व नंदीग्रामच्या तृणमूल उमेदवार ममता बॅनर्जी यांना पाठवले आहे. ममता बॅनर्जी यांनी १ एप्रिल रोजी याबाबत तक्रार करताना नंदीग्राम येथील निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाले व मतदान केंद्रांवर बाहेरील लोक उपस्थित होते, असा आरोप केला होता.

प्रसारमाध्यमांमुळे गैरसमज झाल्याचा आयोगाचा दावा

निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्या आरोपातील प्रत्येक मुद्याला उत्तर दिले असून त्यात म्हटले आहे, की निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार असे प्रकार झालेले नाहीत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी जी हस्तलिखित तक्रार दिली आहे त्यातील आरोपात तथ्य नाही. प्रसारमाध्यमातील चित्रणामुळे परिस्थितीबाबत गैरसमज निर्माण झाले. मतदारांमध्ये गैरसमज निर्माण झाले असतील तर एकवेळ समजून घेता येईल पण मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जी  यांचेही गैरसमज झालेले दिसतात हे दुर्दैवी आहे.