सोमवारी रात्रीची वेळ…अमरनाथ दर्शन घेऊन आलेल्या भाविकांची बस जम्मूच्या वाटेवर होती. पण संध्याकाळच्या सुमारास बसचा टायर पंक्चर झाला. तो दुरुस्त करण्यात काही वेळ गेला. तोपर्यंत रात्र झाली होती. अंधारातून मार्ग काढत बस जम्मूकडे पुन्हा निघाली. अनंतनागमध्ये बस पोहोचली. अचानक गोळीबाराचा आवाज ऐकू आला. काहीतरी विपरीत घडतंय, याचा अंदाज आलाच होता. बेधुंद गोळीबारात बसच्या काचा फुटल्या. काही कळायच्या आतच होत्याचं नव्हतं झालं होतं…दहशतवादी हल्ल्याचा हा थरार यातून वाचलेल्या भाविकांच्याच शब्दांतून….

या हल्ल्यात डहाणूतील दोन महिला भाविकांचा मृत्यू झाला. निर्मला ठाकूर आणि उषा सोनकर अशी या दुर्दैवी भाविकांची नावे आहेत. हल्ल्यातून बचावलेल्या भाग्यमणी या निर्मला यांच्या बहिण. त्याही या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. या दोघीही बसच्या खिडकीत बसल्या होत्या. दहशतवाद्यांच्या गोळीबारात निर्मला यांना गोळी लागली आणि त्या कोसळल्या. चार ते पाच दहशतवादी होते. दोघे जण मोटरसायकलवरून आले होते. कदाचित जास्तही असतील. दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात होते. त्यामुळे आमच्यावर पोलीस का गोळीबार करत आहेत, असा प्रश्न आम्हाला पडला होता, असे निर्मला सांगतात.

दहशतवादी गोळीबार करत होते. त्याचवेळी सर्व भाविक ‘नमः शिवाय!’ असा धावा करत होते. बसच्या चालकाने धीराने बस पुढे नेली. गोळीबार सुरुच होता, पण तो घाबरला नाही. त्याने दीड किलोमीटरपर्यंत बस चालवत नेली. त्याच्यामुळे इतर भाविकांचे प्राण वाचले, असे गुजरातमधील वलसाड येथील रमेश पटेल यांनी सांगितले. एका दहशतवाद्याने धावत्या बसमध्येच घुसण्याचा प्रयत्न केला. पण क्लिनरने त्याला घुसून दिले नाही. त्यानेही धैर्याने बसचा दरवाजा लावून घेतला आणि दहशतवाद्याला ढकलून दिले. तब्बल १० ते १५ मिनिटे बस पुढे नेऊन ती लष्कराच्या तळाजवळ थांबवली. बस बघताच जवान आले आणि त्यांनी सर्व प्रवाशांना एकेक करून बाहेर काढले. हा हल्ला म्हणजे सर्वांनाच धक्का होता, असेही पटेल यांनी यांनी सांगितले.