अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका पार पडणार आहेत. त्यापूर्वी डोनाल़्ड ट्रम्प यांच्या जीवनावर त्यांच्या भाचीनं लिहिलेलं एक पुस्तक समोर आलं आहे. जॉन बोल्टन यांच्यानंतर ट्रम्प यांची भाची मेरी ट्रम्प यांच्या पुस्तकातील काही भाग प्रकाशित झाला आहे. या पुस्तकात मेरी ट्रम्प यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बालपणाबद्दल अनेक गौप्यस्फोट केले आहेत. २८ जुलै रोजी प्रकाशित होणारं हे पुस्तक आता १४ जुलै रोजी प्रकाशित केलं जाणार आहे. दरम्यान, बालपणी ट्रम्प यांच्या वडिलांकडून त्यांचा छळ होत होता आणि आजही डोनाल्ड ट्रम्प हे तीन वर्षांच्याच मुलाप्रमाणे असल्याचा दावा ‘टू मच अँड नेव्हर इनफ: हाऊ माय फॅमिली क्रिएटेड द वर्ल्ड्स मोस्ट डेंजरस मॅन’ या पुस्तकातून करण्यात आला आहे.

“डोनाल्ड ट्रम्प यांच्या वडिलांना प्रेमाचा अर्थच माहित नव्हता. त्यांना केवळ त्यांच्या आज्ञेचं पालन करून घेता येत होता. डोनाल्ड ट्रम्प यांनादेखील जबरदस्ती त्यांच्या आज्ञेचं पालन करावं लागत होतं,” असा दावा मेरी ट्रम्प यांनी पुस्तकातून केला आहे. मेरी ट्रम्प या डोनाल्ड ट्रम्प यांचे ज्येष्ठ बंधू फ्रेड ज्यूनियर यांच्या कन्या आहेत. “डोनाल्ड ट्रम्प हे दोन वर्षांचे असताना त्यांची आई आजारी पडली आणि तेव्हापासून ट्रम्प यांचे वडिलचं त्यांचं संगोपन करत होते. ते आपल्या कामात इतके व्यस्त होते की डोनाल्ड ट्रम्प यांच्या संगोपनावर त्यांचं अधिक लक्ष नव्हतं. तसंच आपल्या मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आपली नसल्याचंही त्यांना वाटत होतं. याचाच परिणाम डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवनावर झाला,” असा दावा मेरी ट्रम्प यांनी केला आहे.

आजही ३ वर्षांच्या मुलाप्रमाणेच ट्रम्प

“डोनाल्ड ट्रम्प हे आताही बऱ्यापैकी तसेच आहेत जसे ते तीन वर्षांचे असताना होते. त्यांना कसे वाढवायचे, शिकणं किंवा चांगलं होणं, भावनांना आवर घालणं, प्रतिक्रिया देताना विचार करणं असे प्रकार जमत नाहीत,” असंही पुस्तकाच्या मागील बाजूला नमूद करण्यात आलं आहे.

चूक कबुल करणं नाही तर फसवणूक शिकले

मेरी ट्रम्प यांच्या मते ट्रम्प कुटुंबात आपल्या चुकांची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी फसवणूक करण्यास प्रोत्साहन दिलं जातं. “ट्रम्प कुटुंबीयांनी फ्रेड सीनिअर यांच्या मानसिक आरोग्याचा फायदा घेत फ्रेड ट्रम्प – lll यांना आपल्या वारसा हक्कातून बाहेर केलं.” असा आरोपही त्यांनी केला. मेरी आणि फ्रेड यांचे वडील फ्रेड ज्यूनिअर यांचा १९८१ मध्ये मृत्यू झाला.

कायदेशीर बाबींमध्ये अडकलं पुस्तक

या पुस्तकावरून ट्रम्प कुटुंबीय आणि मेरी ट्रम्प यांच्या कायदेशीर वाद सुरू झाले आहेत. गुरूवारी यासंदर्भात न्यूयॉर्कमध्ये सुनावणी पार पडणार आहे. मेरी यांनी २० वर्षांपूर्वी एका नॉन-डिस्क्लोजर करारावर स्वाक्षरी केली होती. या अंतर्गत त्या यावर लिहू शकत नाहीत, असा दावा ट्रम्प कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.