अमेरिकेने इराणचा टॉप लष्करी कमांडर जनरल कासिम सुलेमानीचा खात्मा करताना जगाला आपल्याकडे असलेले तंत्रज्ञान दाखवून दिले. बगदाद विमानतळाच्या दिशेने चाललेल्या सुलेमानीच्या ताफ्यावर हजारो फूट उंचीवरुन अत्यंत अचूकतेने हल्ला केला. सुलेमानीला स्वत:च्या बचावाची संधी सुद्धा मिळाली नाही. अमेरिकेने त्यासाठी कुठल्याही ब्रह्मास्त्राचा वापर केला ते जाणून घेऊया.

काय आहे MQ 9 ?
सुलेमानीवर प्राणघातक हल्ला करण्यासाठी MQ 9 रीपर ड्रोनचा वापर करण्यात आला. हे अत्यंत उच्च तंत्रज्ञान असलेले टेहळणी आणि लक्ष्यभेदी ड्रोन आहे. MQ 9 चे वैशिष्टय म्हणजे हेरगिरीसाठी हे ड्रोन जितके उपयुक्त आहे, तितकेच हवाई हल्ल्यामध्ये घातक आहे. खास कासिम सुलेमानीसाठी अमेरिकेने हे ड्रोन पहिल्यांदा वापरलेले नाही. यापूर्वी शत्रुंना संपवण्यासाठी अमेरिकेने या ड्रोनचा वापर केला.

MQ 9 हेरगिरीमध्ये काय करु शकतं?
MQ 9 लक्ष्याची गुप्त माहिती गोळा करण्याबरोबर हल्ला करण्यासही तितकेच सक्षम आहे. एखादी गोष्ट शोधून नष्ट करण्यामध्ये हे ड्रोन माहीर आहे. एकाचवेळी वेगवेगळी कामे करु शकणारे हे एक बहुउपयोगी ड्रोन आहे. या ड्रोनमध्ये बराचवेळ हवेत उड्डाण करण्याची क्षमता आहे. अमेरिकन हवाई दल २००७ पासून या ड्रोनचा वापर करत आहे.

MQ 9 चा अर्थ काय?
MQ 9 अमेरिकेच्या परदेशातील सैन्य मोहिमांमध्ये मदत करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आले आहे. MQ 9 मधील 9 म्हणजे ही या ड्रोनची नववी सीरीज आहे. २,२२२ किलो वजनाचे हे ड्रोन जमिनीवर चालणाऱ्या छोटया-छोटया गोष्टीही आपल्या कॅमेऱ्यामध्ये अत्यंत अचूकतेने पकडून कमी वेळात हल्ला करु शकते.

किती घातक आहे हे ड्रोन ?
MQ 9 घातक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेले ड्रोन आहे. यामध्ये हवेतून जमिनीवर हल्ला करु शकणारे AGM-114 हेलफायर मिसाइल आहेत. हे मिसाइल लक्ष्यावर अत्यंत अचूकतेने प्रहार करते. त्यामुळे आसपास कमीत कमी नुकसान होते. यामध्ये १,७०१ किलो वजनाचे बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता आहे.

कसे उड्डाण करते?
MQ 9 हे मानवरहित ड्रोन विमान आहे. दूर अंतरावर राहून तुम्ही या ड्रोनचे संचालन करु शकता. नियंत्रण कक्षातून MQ 9 ऑपरेट करण्यासाठी एक पायलट आणि एक सेंसर ऑपरेटर असतो. हे विमान प्रतितास ३६८ किलोमीटर वेगाने उड्डाण करु शकते. MQ 9 रीपर ड्रोन ५० हजार फूट उंचीपर्यंत पोहोचू शकते. या ड्रोनमध्ये एकाचवेळी २,२०० लीटर इंधन भरता येते.