News Flash

देशभरात लॉकडाउन होणार का?; अमित शाहांचं मोठं विधान

राष्ट्रीय लॉकडाउनची शक्यता फेटाळली, पण राज्य पातळीवर लॉकडाउनबद्दल दिली माहिती़

अमित शाह यांनी देशात लॉकडाउन लावण्याबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे. (छायाचित्र। इंडियन एक्स्प्रेस)

करोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात विक्रमी रुग्णवाढ होत असून, रुग्णांचे बेडसह इतर मुलभूत आरोग्य सुविधांअभावी अतोनात हाल होत असल्याचं दिसत आहे. या परिस्थितीमुळे पुन्हा देशात पुन्हा लॉकडाउन लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लॉकडाउनच्या चर्चेवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीत मोठं विधान केलं आहे.

अमित शाह यांनी टाइम्स नाऊ वृत्तवाहिनाला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी करोनासह देशातील विविध मुद्द्यांवर केंद्र सरकारची भूमिका मांडली. करोनामुळे देशात बिकट परिस्थिती निर्माण झाल्यानं देशात पुन्हा लॉकडाउन लावण्याबद्दल केंद्राच्या भूमिकेबद्दल शाह यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना शाह म्हणाले,”केंद्र सरकारने तीन महिन्यांपूर्वीच राज्यांना स्वतः निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. लॉकडाउनसारखे उपाय राज्यांना आपापल्या पातळीवर घ्यावे लागतील, कारण विविध राज्यांतील परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे राज्यांनीच स्वतः निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेणं योग्य राहिल. गेल्या वर्षी लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात केंद्रानं करोनाशी लढा देण्यासाठी मुलभूत सुविधा उभारल्या आहेत,” असं सांगत शाह यांनी राष्ट्रीय लॉकडाउनची शक्यता फेटाळून लावली आहे.

आणखी वाचा- करोना रुग्णसंख्येचा विस्फोट; तीन लाखांकडे वाटचाल…. मृत्यू संख्येत मोठी वाढ

केंद्राने करोनाच्या दुसऱ्या लाटेवरून लक्ष हटवल्याच्या आरोपावर बोलताना अमित शाह म्हणाले,”असं म्हणणं चुकीचं आहे. करोनाविरोधी लढ्यात केंद्र कुठेही कमजोर पडलेलं नाही. करोना परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळणाऱ्या देशांमध्ये भारताचाही समावेश आहे. करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. त्याचबरोबर मृत्यूदरही कमी आहे. दुसरी लाट फक्त भारतातच नाही, तर अनेक देशांमध्ये आलेली आहे. करोनाविरोधी लढाईलाच केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम आहे,” असं अमित शाह यांनी सांगितलं.

अमित शाहांनी व्यक्त केली नाराजी

“कुंभ असो किंवा रमजान असो कुठेही करोनासंदर्भातील नियम पाळल्याचं दिसून आलं नाही. असं वागणं चुकीचं आहे. त्यामुळेच आम्ही आवाहन केलं आणि आता कुंभमेळा प्रातिनिधिक पद्धतीने साजरा करावा. सध्या ज्या वेगानं करोना विषाणूचा प्रसार होत आहे, त्यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र या दुसऱ्या लाटेविरोधातील लढाई आपण जिंकू असा मला पूर्ण विश्वास आहे,” असं शाह म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2021 11:08 am

Web Title: amit shah on national lockdown lockdown in india covid 19 surge in india bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 करोना रुग्णसंख्येचा विस्फोट; तीन लाखांकडे वाटचाल…. मृत्यू संख्येत मोठी वाढ
2 करोना काळात प्राण गमावणाऱ्या आरोग्य योद्ध्याचं विमा छत्र मोदी सरकारनं काढलं
3 “लोकांच्या रोषाला सामोरं जाऊ, पण मृतदेहांचे ढिग बघायचे नाहीत”
Just Now!
X