दिल्लीमध्ये रिंकू शर्मा या तरूणाची हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. भाजपा युवा मोर्चा आणि विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता असलेल्या रिंकूच्या हत्येवरून दिल्लीतील वातावरण गरम झालं आहे. त्यातच आता आम आदमी पक्षाने दिल्लीत खून होणं सर्वसामान्य गोष्ट झाली असून, रिंकू शर्माच्या हत्येला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात आपने अमित शाह यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.

रिंकू शर्मा यांची व्यावसायिक वादातून हत्या करण्यात आल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी संकलन करण्यावरून त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा विश्व हिंदू परिषदेनं केला आहे. रिंकू शर्माच्या हत्येवरून दिल्लीत राजकीय आरोप प्रत्यारोप शिगेला पोहोचले आहेत. त्यातच आता आपने या हत्येसाठी अमित शाह यांना जबाबदार धरलं आहे.

“दिल्लीत खूनाच्या घटना होणं ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे. या हत्यांसाठी केंद्रीय गृहमंत्री जबाबदार आहेत. भाजपा सरकारच्या काळातच हिंदू सुरक्षित नाहीत. दिल्लीतील कायदा सुव्यवस्था खराब झाली आहे. अनेक घटनांतून हेच समोर आलं आहे की, दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था राखण्यात केंद्रीय गृहमंत्रालय सपशेल अपयशी ठरलं आहे. आम्ही या हत्येचा तीव्र निषेध करतो आणि गृहमंत्रालयाला विनंती करतो की कायदा व सव्यवस्थेवरून लोकांचा विश्वास पुन्हा कायम होण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत,” आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे.

रिंकू आणि शेजारी राहणाऱ्या नसरुद्दीन यांच्यात काही धार्मिक मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. बुधवारी रात्री नसरुद्दीन आणि इतर तिघे जबरदस्ती रिंकूच्या घरात घुसले आणि त्याच्या पाठीवर चाकूने वार केले. आतापर्यंत तपासात मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान रेस्तराँ बंद करण्यावरुन हा वाद झाला होता. सर्वजण एकमेकांना ओळखत होते आणि एकाच परिसरात राहत होते. हत्येमागे इतर कोणतं कारण असल्याचा दावा चुकीचा आहे.” असं पोलिसांनी या प्रकरणावर सांगितलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली असून, प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलं आहे.