नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या शनिवारच्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पक्ष आगामी निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी करेल असा आत्मविश्वास नोंदवला. इतकेच नाही तर पाच राज्यांत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि २०१९ची सार्वत्रिक निवडणूक यात पक्ष २०१४पेक्षा सरस कामगिरी करील, असा दावाही केला गेला. गेल्या निवडणुकीत भाजपने ५४३पैकी २८२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी आपल्याला बेफिकीर राहून चालणार नाही, तर अधिक जिद्दीने काम करावे लागेल, असे शहा यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर लोकसत्ताने घेतलेल्या एका फेसबुक आणि ट्विटर मत चाचणीमध्ये वाचकांनी अमित शहा यांच्या मताशी सहमत नसल्याचा कौल दिला आहे. साडेतीन हजारहून अधिक वाचकांनी या मतचाचणीत आपले मत नोंदवले

फेसबुकवर २ हजार ९००हून अधिक वाचकांनी या प्रश्नासंदर्भात आपले मत नोंदवले. त्यापैकी ६७ टक्के वाचकांनी म्हणजेच १ हजार ९००हून अधिक वाचकांनी अमित शहांचा हा दावा चुकीचा असून भाजपला २०१४ च्या निवडणुकांसारखे यश मिळणार नाही असे मत नोंदवले आहे. तर ३३ टक्के म्हणजेच ९५२ जणांनी शहांच्या मताशी सहमती दर्शवत भाजपला आगामी निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळेल असे मत नोंदवले आहे.

तर ट्विटरवरील याच मत चाचणीमध्ये ८७६ जणांनी आपले मत नोंदवले असून त्यापैकी ७० टक्के लोकांनी नकारात्मक उत्तर देत भाजपची कामगिरी मागील निवडणुकांपेक्षा सुमार दर्जाची असेल असे मत नोंदवले आहे. तर ३० टक्के लोकांनी म्हणजेच २५० हून अधिक लोकांनी शहांच्या मताशी सहमती दर्शवली आहे.

एकंदरीत सांगायचे झाले तर ३ हजार ७००हून अधिक मते या मत चाचणीमध्ये नोंदवली गेली. त्यापैकी २ हजार ४००हून अधिक वाचकांनी शहा यांचे मत चुकीचे असून भाजपला २०१४ सारखी कामगिरी करता येणार नाही असे मत नोंदवले आहे.

नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या शनिवारच्या बैठकीत २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ‘अजेय भारत’ची घोषणा केली गेली. शहा यांच्या पक्षाध्यक्षपदाची मुदत जानेवारी २०१९मध्ये संपत आहे. मात्र लोकसभेची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वाखाली लढविण्यासाठी त्यांच्या अध्यक्षपदाची मुदत वाढविण्यावरही शिक्कामोर्तब झाले. या राष्ट्रीय कार्यकारिणीत काँग्रेस पक्षालाच मुख्यत्वे लक्ष्य करण्यात आले. भाजप देश जोडण्याचे काम करीत असतानाच काँग्रेस मात्र देश तोडण्याचे काम करीत आहे, असा आरोप अमित शहा यांनी केला. ते म्हणाले की, अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यावरून विरोधक जनतेची दिशाभूल करीत आहेत आणि समाजात दुही माजवू इच्छित आहेत. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन स्थापलेले महागठबंधन ही धूळफेक आहे, अशी टीका शहा यांनी केली.