संपूर्ण देशभर करोना रुग्णांची संख्या चिंताजनक वेगाने वाढत असून गेल्या चोवीस तासांत ५५ हजार ७८ लोकांना संसर्ग झाला, तर ७७९ रुग्ण दगावले. तर महाराष्ट्रात १०,३२० रुग्णांची नोंद झाली.

देशातील एकूण रुग्णसंख्या १६ लाख ३८ हजार ८७० वर पोहोचली असून आतापर्यंत करोना संसर्गाने ३५ हजार ७४७ लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ३७ हजार २२३ रुग्ण करोनामुक्त झाले असून ५ लाख ४५ हजार ३१८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी उच्चस्तरीय मंत्रिगटाच्या १९व्या बैठकीत दिली. केंद्र सरकारने पुणे, ठाणे, बेंगळूरु, हैदराबाद अशा करोनाग्रस्त शहरांवर लक्ष केंद्रित केले आहे.

राज्यात १०,३२०

लागोपाठ दुसऱ्या दिवशी राज्यात १०,३२० नवे रुग्ण आढळले. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या सव्वाचार लाखांच्या आसपास पोहोचली आहे. राज्यात करोना बळींची संख्या १५ हजारांच्या घरात पोहोचली आहे.

मुंबईत ११०० जणांना संसर्ग

मुंबईत शुक्रवारी ११०० रुग्णांची नोंद झाली असून ५३ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत सध्या २०,५६९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मुंबईत ५३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा ६३५० वर गेला आहे. मुंबईतील करोना रुग्णवाढीचा सरासरी दर एक टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. मात्र मुंबईतील बोरिवली आणि नानाचौक-मलबार हिल या भागात हा दर सर्वात कमी आहे. ठाणे जिल्ह्य़ातील नव्या रुग्णसंख्येत नवी मुंबईतील ३९८, ठाण्यातील ३५५, कल्याण-डोंबिवली शहरातील ३२९, ठाणे ग्रामीणमधील १९०, मीरा-भाईंदरमधील १२७, अंबरनाथमधील ६२, उल्हासनगर शहरातील ५४, बदलापूरमधील ५१ आणि भिवंडीमधील २७ रुग्णांचा समावेश आहे.

ठाणे जिल्ह्य़ात १,५९३ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात शुक्रवारी १,५९३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील एकूण रुग्णांची संख्या ८५,९५६ वर पोहोचली आहे. दिवभरात ४३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्य़ातील मृतांचा आकडा २,३६५ झाला आहे.