सीमेवर भारत व चीन दरम्यान तणाव उद्भवला असतानाच; सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी ३८ हजार ९०० कोटी रुपये खर्चून ३३ लढाऊ जेट विमाने, अनेक क्षेपणास्त्र यंत्रणा आणि इतर लष्करी साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी मंजुरी दिली.

रशियाकडून २१ मिग-२९ लढाऊ विमाने खरेदी करण्यात येणार असून, सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) कडून १२ एसयू-३० एमकेआय (सुखोई) विमाने खरेदी केली जाणार आहेत. सध्या कार्यरत असलेल्या ५९ मिग-२९ विमानांचा दर्जा वाढवण्याचा स्वतंत्र प्रस्तावही मंजूर करण्यात आला आहे.

२४८ ‘अ‍ॅस्ट्रा’ क्षेपणास्त्र यंत्रणेच्या खरेदीलाही मंजुरी देण्यात आली आहे. स्वनातीत विमानाला खिळवून ठेवून नष्ट करणाऱ्या या यंत्रणेची सर्व प्रकारच्या वातावरणात दिवसा तसेच रात्रीही काम करण्याची क्षमता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण साहित्य खरेदी परिषदेच्या (डीएसी) बैठकीत या खरेदीबाबत निर्णय घेण्यात आले.