लष्कर प्रमुख दलबीर सिंह सुहाग यांनी मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषवरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. सीमेवरील परिस्थिती अत्यंत तणावाची असल्याने आणि सीमेपलीकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू असल्याने सतर्क राहण्याच्या सूचना दलबीर सिंह सुहाग यांनी जवानांना दिल्या आहेत.

‘लष्कर प्रमुख दलबीर सिंह सुहाग यांनी उत्तरेकडील मुख्य तळ असलेल्या उधमपूरला भेट दिली,’ अशी माहिती एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दिली आहे. भारताकडून सात जवान मारले गेल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आल्यानंतर दलबीर सिंग सुहाग यांनी नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

‘पाकिस्तानकडून वारंवार आगळीक केली जात असल्याने जवानांनी सतर्क राहा. शत्रूच्या प्रत्येक कारवाईला आक्रमकपणे प्रत्युत्तर द्या,’ अशा सूचना दलबीर सिंह सुहाग यांनी भारतीय जवानांना दिल्या. यावेळी सुहाग यांनी कमांडर्ससोबत संवाद साधला आणि नियंत्रण रेषेवरील स्थितीचा आढावा घेतला.

पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला चोख प्रत्युत्तर द्या, असे सुहाग यांनी म्हटले आहे. लष्कराचा उत्तर विभाग, हवाई दल, निमलष्करी दल, नागरी प्रशासन, केंद्रीय पोलीस यांच्यामधील समन्वयाचे यावेळी दलबीर सिंह सुहाग यांनी कौतुक केले.

१८ सप्टेंबरला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरीमधील लष्करी तळावर हल्ला केला. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने २९ सप्टेंबरला सर्जिकल स्ट्राइक केले. भारतीय सैन्याने सीमारेषा ओलांडत पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याच्या या धाडसी कारवाईत ३८ ते ४० दहशतवादी मारले गेले. भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे.