केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात दहा कोटींचा बदनामीचा खटला दाखल केला. केजरीवाल यांच्यासह संजय सिंग, राघव चढ्ढा, आशुतोष आणि दीपक वाजपेयी यांच्याविरोधातही बदनामीचा खटला दाखल करण्यात आला आहे.
दिल्ली जिल्हा क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी असताना भ्रष्टाचार केल्याचा निराधार आरोप करून आपली बदनामी केल्याचे जेटली यांच्यातर्फे न्यायालयात सादर करण्यात आलेल्या याचिकेत म्हणण्यात आले आहे. दिल्लीतील पतियाळा हाऊस न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला. डीडीसीएच्या कारभारातील गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी दिल्लीतील सरकारने रविवारी गोपाल सुब्रमण्यम यांची एकसदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जेटली यांच्याकडून बदनामीचा खटला दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीमध्ये गेल्या आठवड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपच्या नेत्यांनी जेटलींवर गंभीर आरोप केले होते. दिल्लीमध्ये क्रिकेटचे मैदान तयार करण्यासाठी डीडीसीएने २४ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली होती. पण प्रत्यक्षात ११४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. जेटली हे ‘एलिट क्लब’प्रमाणे डीडीसीएचा कारभार चालवत होते, असे आरोप करण्यात आले होते. अरूण जेटली जोपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळात कायम आहेत. तोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाऊ शकत नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी ‘आप’चे नेते संजय सिंग यांनी केली होती.