गोव्यामधील प्रचारादरम्यान आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या विधानाचे स्पष्टीकरण १९ जानेवारी आधी देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. गोव्यामध्ये ८ जानेवारी रोजी दिलेल्या भाषणाप्रकरणी त्यांना ही नोटीस बजवण्यात आली आहे.

जर, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या नेत्यांनी तुम्हाला पैसे देऊ केले तर ते स्वीकारा असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले होते.  त्यानंतर त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल झाली होती. गोव्याचे निवडणूक आयुक्त कुणाल यांनी म्हटले होते की ९ जानेवारी रोजी याबाबतची माहिती आमच्या हाती लागली होती. त्या आधारावर आम्ही जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला होता. हे अहवाल आल्यानंतर आम्ही भारताच्या निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हा निवडणूक आयोगाकडे अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाची सीडी अद्याप पोहचली नाही असे गोव्याचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी नारायण नवती यांनी पत्रकारांना म्हटले आहे.

जर भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसचे नेते जर तुम्हाला पैसे देत असतील तर ते स्वीकारा. तो तुमचाच पैसा आहे. त्यांना परत करण्याची गरज नाही असे ते म्हणाले होते. परंतु जेव्हा मतदान करण्याची वेळ येईल तेव्हा केवळ आम आदमी पक्षाच्याच उमेदवाराला मतदान करा असे केजरीवाल यांनी म्हटले होते. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही दिल्लीमध्ये सत्तेमध्ये आहोत परंतु आम आदमी पक्षाने कधी सत्तेचा दुरुपयोग केला नाही. त्यामुळे आमच्या बॅंकेच्या खात्यामध्ये काहीच पैसे नाही असे त्यांनी म्हटले होते. आम्हाला वाटले असते तर आम्ही भ्रष्टाचार केला असता परंतु आमचा पक्ष एक प्रामाणिक पक्ष असल्याचे ते म्हणाले. इतर राजकीय पक्ष आणि आम आदमी पक्षात हाच फरक आहे असे ते म्हणाले. आमच्या जवळ पंजाब आणि गोवा निवडणुकीवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. परंतु आम्ही जनतेच्या सहकार्याने ही निवडणूक लढवत आहोत. आमच्याकडे पैसे नसल्यामुळेच आम्ही उत्तर प्रदेशात निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. गोव्यामध्ये आम आदमी पक्षाचे २८-३० आमदार निवडून येतील आणि येथे आमचेच सरकार राहील असे ते यावेळी म्हणाले होते.