केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्यात दिल्लीतील न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेला खटला मंगळवारी मागे घेतला. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. आशुतोष कुमार यांनी खटला मागे घेण्याला मंजुरी दिली. हा खटला चालवायचा नसल्याचे केजरीवाल यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.
आम आदमी पक्षाने प्रसिद्ध केलेल्या देशातील सर्वाधिक भ्रष्ट व्यक्तींच्या यादीमध्ये नितीन गडकरी यांच्याही नावाचा उल्लेख होता. याच आरोपावरून गडकरी यांनी केजरीवाल यांच्याविरोधात बदनामीची याचिका दाखल केली होती. गडकरी यांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने त्यांच्याविरोधात केजरीवाल यांनी खोटे आरोप केल्याचा युक्तिवाद गडकरी यांचे वकील पिंकी आनंद आणि अजय दिगपॉल यांनी न्यायालयात केला होता. या संदर्भात दिल्लीतील उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात केजरीवाल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
१७ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्याविरोधातील दोन बदनामीच्या खटल्यांना स्थगिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयातील खटला केजरीवाल यांच्याकडून मागे घेण्यात आला आहे.