भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर ते ऑक्टोबर महिन्यांत पुन्हा अमेरिकेला परतणार आहेत. अमेरिकेत त्यांचे कुटुंब असून कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी आपण हा राजीनामा दिल्याचे सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.

फेसबुक पोस्टमध्ये अरुण जेटलींनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी माझ्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. आपल्याला पुन्हा अमेरिकेत आपल्या घरी जाण्याची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले होते. यासाठी माझे कारण वैयक्तिक असले तरी ते माझ्यासाठी खुपच महत्वाचे आहे. काही कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा दबाव असल्याने आपल्याला हा निर्णय घ्यावा लागत आहे. सुब्रमण्यम यांनी कौटुंबिक कारण दिल्याने आपल्याकडे कुठलाही पर्याय नसल्याचे त्यांची अडचण लक्षात घेता मी देखील त्यांना परवानगी दिली.

नियुक्तीच्या तीन वर्षांनंतर सुब्रमण्यम यांचा मुख्य आर्थिक सल्लागारपदाचा कार्यकाळ १६ ऑक्टोबर २०१७ रोजी संपला होता. त्यानंतर त्यांना गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत एक वर्षांसाठी त्यांची मुदत वाढवण्यात आली होती. सुब्रमण्यम हे देशाच्या भविष्यासाठी उत्कृष्ट धोरणकर्ते असल्याचे मत अरुण जेटली यांनी त्यांची नियुक्ती करताना व्यक्त केले होते.

अरविंद सुब्रमण्यम यांची ऑक्टोबर २०१४ मध्ये भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी दिल्लीच्या स्टिफन्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबाद येथून एमबीए केले. त्यानंतर युकेमधील जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड विद्यापीठातून त्यांनी M.Phil आणि D.Phil केले. त्याचबरोबर पिटरसन इन्स्टिट्युट ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स येथे ते वरिष्ठ पदावर काम करीत होते.