ईशान्य दिल्लीमध्ये रविवारपासून सुरु असणाऱ्या हिंसेमध्ये आतापर्यंत २७ जणांना प्राण गमावावे लागले आहेत. दिल्लीतील अनेक भागांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे तरी चार दिवस होऊनही पोलिसांना परिस्थिती आटोक्यात आणण्यात यश आलेलं नाही. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणारे आणि समर्थन करणाऱ्यांमध्ये झालेल्या वादामुळे दिल्लीतील अनेक भागांमध्ये धार्मिक तेढ निर्माण झाली आहे.

यमुना विहार परिसरातील अनेक नागरिकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आम्ही मागील अनेक वर्षांमध्ये अशाप्रकारची धार्मिक हिंसा आम्ही याआधी कधीही पाहिली नव्हती असं मत व्यक्त केलं आहे. एकीकडे दिल्लीत अशी परिस्थिती असताना दुसरीकडे दिल्लीमध्ये या हिंसेदरम्यान काही सकारात्मक गोष्टीही पहायला मिळत आहेत. अनेकांनी ट्विटवरुन त्यांना दिल्लीतील या तणावपूर्ण वातावरणामध्ये आलेले सामाजिक बांधिलकी जपणारे अनुभव शेअर केले आहेत.

एका समुदायातील लोक दुसऱ्या समुदायाच्या लोकांना आश्रय देत असल्याचे अनेकांनी ट्विटवरुन शेअर केलं आहे. अनेक ठिकाणी गुरुद्वारांमध्ये लोकांना राहण्यासाठी जागा आणि खाणं उपलब्ध करुन दिलं आहे. लेखिका असणाऱ्या निलराजन रॉय यांनी दिल्लीमध्ये आलेला अनुभव आणि महिती ट्विटवरुन शेअर केली आहे.

सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी अशाप्रकारे त्यांना या हिंसेदरम्यान आलेले सकारात्मक अनुभव शेअर केले आहेत. खास करुन अनेकांनी शीख सुमदायाकडून होणाऱ्या मदतीचे कौतुक केल्याचे दिसत आहे.