पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर ओम आणि गाय या शब्दांचा हवाला देत शरसंधान केले होते. “या देशात ही दुर्भाग्याची गोष्ट आहे की, ओम आणि गाय हे शब्द कानावर पडले तर काही लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. देश पुन्हा १६व्या शतकात गेल्यासारख त्यांना वाटतं”, अशी टीका मोदी यांनी विरोधकांवर केली होती. त्याला एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संविधानाचा दाखला देत उत्तर दिले आहे.

मथुरेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मोदी यांनी शेतकरी आणि पशुधन सेवेवर भर दिला. तसेच ओम आणि गाय या शब्दांचा उल्लेख करून विरोधकांवर टीका केली. “या देशात ही दुर्भाग्याची गोष्ट आहे की, ओम आणि गाय हे शब्द कानावर पडले तर काही लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. देश पुन्हा १६व्या शतकात गेल्यासारखं त्यांना वाटतं. अस ज्ञान सांगणाऱ्यांनी देशाला बर्बाद केलं आहे आहे”,असे मोदी म्हणाले होते.

मोदी यांच्या टीकेला एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “गाय ही आमच्या हिंदू बांधवासाठी प्रवित्र पशु आहे. पण भारतीयांना संविधानाने जगण्याचा आणि समानतेचा अधिकार दिला आहे. मला आशा आहे की, पंतप्रधान मोदी हे लक्षात ठेवतील”, असे ओवेसी म्हणाले.

यापूर्वीही शबरीमाला प्रकरणातही संविधानामुळे देश असल्याचे सांगत भाजपा आणि मोदी सरकारवर टीका केली होती. “ट्रिपल तलाकचा निषेध करत असून शबरीमला मंदिराच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही धार्मिक भावनेचा आधार घेऊन अंमलबजावणी होत नाही, हा दुटप्पी पणा नाही का”, असा सवाल खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित करीत भाजपवर निशाण साधला होता. “हा देश हिंदूमुळे नाही तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे धर्मनिरपेक्ष आहे”, असे ओवेसी म्हणाले होते.