उत्तरप्रदेशात करोना विषाणूविरुद्धच्या लढय़ात कर्तव्य बजावणारे पोलीस, तसेच आरोग्य आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

करोनाबाबतच्या आढावा बैठकीत गुरुवारी हे निर्देश देतानाच, हिंसाचारात सहभागी असलेल्यांना मालमत्तेचे नुकसान भरून द्यायला लावावे, असेही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

अशा लोकांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये आणि भारतीय दंड संहितेनुसारही कठोर कारवाई करावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

एखादी व्यक्ती राष्ट्रीय सुरक्षेसाठी किंवा कायदा व सुव्यवस्थेसाठी धोका आहे अशी अधिकाऱ्यांची खात्री झाल्यास त्याला कुठलाही आरोप न ठेवता १२ महिन्यांपर्यंत कैदेत ठेवण्याचा अधिकार कठोर अशा राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये देण्यात आला आहे.

मुरादाबाद येथे एका करोनाबाधित इसमाला विलगीकरणात नेत असलेल्या एका वैद्यकीय पथकाला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावाने रुग्णवाहिकेवर दगडफेक केली असता एक डॉक्टर व ३ आरोग्य कर्मचारी जखमी झाले होते. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले.

राज्यात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आल्याचे एका अधिकृत प्रवक्त्याने सांगितले.

मालमत्तांची नासधूस करणाऱ्यांकडून भरपाई..

* अशा हल्ल्यांदरम्यान झालेल्या मालमत्तेच्या नुकसानाची किंमत कारवायांमध्ये सहभागी होणाऱ्या आणि कर्तव्याधीन कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांकडून वसूल करण्यात यावी, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. आरोपी व्यक्ती नुकसानाची किंमत भरून देण्यास अपयशी ठरल्यास त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात याव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले.

* करोना संसर्गाची माहिती लपवणाऱ्या आणि या रोगाबाबत जाणूनबुजून न कळवणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, असेही निर्देश आदित्यनाथ यांनी दिले. आारोग्य विभागाची पथके निनिराळ्या भागांना भेट देतील, त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यासोबत जावे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.