News Flash

महाराष्ट्र, दिल्लीत हल्ल्यांचा कट 

ज्यांना अटक करण्यात आली ते दहशतवादी कटात वेगवेगळ्या भूमिका पार पाडणार होते.

महाराष्ट्र, दिल्लीत हल्ल्यांचा कट 

सहा जणांना अटक

भारतात सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले  करण्याच्या उद्देशाने आलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यातील दोघांना पाकिस्तानच्या इंटरसव्र्हिसेस इंटेलिजन्स म्हणजे आयएसआय या गुप्तचर संस्थेने प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले आहे, अशी  माहिती दिल्ली पोलिसांतर्फे देण्यात आली.

दिल्लीतील पोलीस अधिकाऱ्यांनी दावा केला की, आयएसआयने दाऊदच्या साथीदारांना हाताशी धरून दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांत सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता.

दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त नीरज ठाकूर यांनी सांगितले की, अटक केलेल्यांत जान महंमद शेख (वय ४७, महाराष्ट्र), ओसामा ऊर्फ सामी (वय २२, जामियानगर), मूलचंद ऊर्फ साजू (वय ४७, रायबरेली), झिशान कमर (वय २८, अलाहाबाद), महंमद अबू बकर (वय २३, बहराइच), महंमद अमीर जावेद (३१, लखनऊ) यांचा  समावेश आहे.

ठाकूर यांनी सांगितले की, दाऊदचा भाऊ अनीश इब्राहिम याला हाताशी धरून आयएसआयने हे हल्ले घडवून आणण्याचे ठरवले होते. त्यासाठी शस्त्रे, स्फोटके व हातबॉम्ब वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवले जाणार होते. अटक केलेल्या सहांपैकी ओसामा व झिशान यांना पाकिस्तानात प्रशिक्षण मिळाल्याचे स्पष्ट झाले असून त्यांना आयएसआयकडून सूचना मिळत होत्या. त्यांना दिल्ली, उत्तर प्रदेशात स्फोट घडवून आणण्यासाठी काही ठिकाणांची टेहळणी करण्यास सांगण्यात आले होते.

ठाकूर यांनी सांगितले की, ज्यांना अटक करण्यात आली ते दहशतवादी कटात वेगवेगळ्या भूमिका पार पाडणार होते. दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम याच्या निकटचा कुख्यात गुंड समीर याला पाकिस्तानने हा कट तडीस नेण्यासाठी पैसे दिले होते. पाकिस्तानातील गुप्त ठिकाणी असलेल्या दहशतवाद्यांकडून त्याला सूचना मिळत होत्या. काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक सुनील राजन व रवींदर जोशी यांना पाकिस्तानच्या या कारस्थानाची माहिती मिळाली होती. भारतात काही ठिकाणी आयइडी स्फोट करण्याचा हा कट होता. त्यासाठी सीमेवरून आयइडी स्फोटके देण्यात आली होती. दहशतवाद्यांची तयारी जोरात सुरू होती व ती प्रगत टप्प्यात होती. मंगळवारी पुन्हा त्याबाबत माहिती समजली होती. त्यानंतर विविध राज्यांत छापे टाकण्यात आले.

सुरुवातीला कोटा येथून जान महंमद शेख याला ताब्यात घेतले गेले, तो दिल्लीला निघाला होता. ओसामा याला ओखला येथे पकडण्यात आले तर सराई काले खान येथे महंमद अबू बकर याला पकडण्यात आले. अलाहाबादेत धिशान तर लखनऊत महंमद अमीर जावेद तर रायबरेलीत मूलचंद याला पकडण्यात आले. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्या राज्यातील एटीएसच्या मदतीने ही कारवाई केली.

ठाकूर यांनी सांगितले की, ओसामा हा २२ एप्रिलला मस्कत येथे जाण्यासाठी निघाला होता. लखनऊ येथून सलाम एअर फ्लाइटने तो गेला. तेथे त्याला झिशान भेटला. त्यांना नंतर पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात आले. एकूण १५-१६ जणांना प्रशिक्षण देण्यात येत होते. ते बंगालीत बोलत होते. ते कदाचित बांगलादेशी असावेत. त्यांचे दोन गट करण्यात आले होते. त्यात एका गटाला झिशानने तर दुसऱ्या गटाला ओसामाने प्रशिक्षण दिले होते.

 

हवालामार्गे स्फोटके, शस्त्रे

अटक करण्यात आलेल्या आरोपींनी त्यांना आरडीएक्स भरलेली आयइडी स्फोटके, हातबॉम्ब, पिस्तुले, काडतुसे स्लीपर सेल कडून मिळाल्याचे कबूल केले. ही सामग्री उत्तर प्रदेशात पाठवण्यात येणार होती. जान महंमद शेख व मूलचंद यांना पाकिस्तानमधील अनिस इब्राहिमने स्फोटके दिली होती. अनिसवर ही कामगिरी आयएसआयने सोपवली होती. शस्त्रे व स्फोटके पाठवणे यासाठी हवाला मार्गाचा अवलंब करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2021 1:19 am

Web Title: attack plot in maharashtra delhi six arrested akp 94
Next Stories
1 शेतकरी आंदोलनामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत चार राज्यांना नोटिसा
2 आदित्यनाथ सरकारकडून गुंडगिरीचा अंत -मोदी
3 ब्रिटनमध्ये शाळकरी मुलांचे लसीकरण
Just Now!
X