उच्चस्तरीय बैठकीत सुरक्षेचा आढावा

पाकिस्तानमधील ‘जैश ए महम्मद’च्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा जवानांनी मोठय़ा प्रमाणावर शस्त्रे व स्फोटके ताब्यात घेतली. त्यांच्याकडील जप्त केलेला हा साठा पाहता देशात विनाशकारी हल्ला करण्याचे दहशतवाद्यांचे मनसुबे होते, मात्र सुरक्षा दलांनी ते वेळीच निष्फळ ठरवले, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.

जम्मूमधील नगरोटा येथील चकमकीत ‘जैश-ए-महम्मद’च्या चार दहशतवाद्यांना सुरक्षा जवानांनी ठार केले. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी महत्त्वपूर्ण ट्वीट केले असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि गुप्तचर संस्थांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेऊन राष्ट्रीय सुरक्षेचा आढावा घेतला.

जम्मू-काश्मीर महामार्गावर नगरोटा येथे दडून बसलेल्या जैशच्या चार दहशतवाद्यांना गुरुवारी सकाळी तीन तास चाललेल्या कारवाईत सुरक्षा जवानांनी ठार मारले. या चकमकीत दोन पोलीस जखमी झाले असून जम्मू पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे दहशतवादी काश्मीर खोऱ्याकडे निघाले होते व मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत होते. खोऱ्यातील स्थानिक निवडणुकांची प्रक्रिया उद्ध्वस्त करण्याचा कट होता, अशी माहिती जम्मूचे पोलीस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी दिली.

मुंबईतील २६/११ हल्ल्याप्रमाणे तयारी

जम्मू-काश्मीरमध्ये २८ नोव्हेंबर ते १९ डिसेंबर या काळात जिल्हा विकास मंडळांच्या निवडणुका होणार आहेत. जम्मू-काश्मीरमधील लोकशाही प्रक्रियेत बाधा आणण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या हल्ल्याप्रमाणे दहशतवादी कृत्याची तयारी केली जात असल्याचे संकेत ‘जैश’च्या दहशतवाद्यांकडील स्फोटकांच्या साठय़ांवरून मिळाले आहेत. मात्र, जवानांच्या सतर्कतेमुळे   हल्ल्याची शक्यता हाणून पाडली गेली, असे ट्वीट पंतप्रधानांनी केले.