भारतात करोनाची वाढती रुग्णसंख्या पाहाता अनेक देशांनी भारतात येण्यापासून आणि भारतातून येण्यापासून त्यांच्या नागरिकांना बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर आता ऑस्ट्रेलियानं देखील कठोर निर्णय घेतला आहे. भारतातून ऑस्टेलियाला जाणारी सर्व प्रवासी विमानं रद्द करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलिया सरकारने घेतला आहे. या आधी एअर इंडियानं ब्रिटनला जाणारी आणि येणारी विमानं रद्द केली आहेत. सध्या भारतात आयपीएलचा हंगाम सुरू असून ऑस्ट्रेलियातील अनेक खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि काही नागरिक देखील भारतात दाखल आहेत. ते देखील या निर्णयामुळे भारतात अडकून राहणार असल्यामुळे त्यांना आता १५ तारखेपर्यंत ऑस्ट्रेलियाला परत जाता येणार नाहीये.

 

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी केली घोषणा!

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी यासंदर्भातली घोषणा केली आहे. “१५ मे पर्यंत विमानांवर असलेली ही बंदी कायम राहणार आहे. भारतातून येणाऱ्या नागरिकांमध्ये करोनाचा धोका वाढू शकतो म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे”, असं स्कॉट मॉरिसन यांनी स्पष्ट केलं आहे. याआधी थायलंड, नेदरलँड, इराण, कॅनडा, युएई, हाँगकॉंग या देशांनी देखील भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर देशात प्रवेशावर बंदी घातली आहे. एअर इंडियानं नुकतीच ब्रिटनला जाणारी आणि येणारी विमानं येत्या ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता.

भारताला दिलासा; २४ तासांत अडीच लाखांहून अधिक रुग्ण उपचारातून बरे

भारतातील करोनाचे भितीदायक आकडे!

गेल्या काही दिवसांपासून भारतात रोज ३ लाखांहून जास्त नवे करोनाबाधित सापडत आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७६ लाख ३६ हजार ३०७ इतकी झाली आहे. तर २७७१ मृत्यूंसोबत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ९७ हजार ८९४ वर पोहोचली आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासांत २ लाख ५१ हजार ८२७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून आतापर्यंत १ कोटी ४५ लाख ५६ हजार २०९ जणांनी करोनावर मात केली आहे. देशात सध्याच्या घडीला २८ लाख ८२ हजार २०४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १४ कोटी ५२ लाख ७१ हजार १८६ जणांचं लसीकरण झालं आहे.