ऑस्ट्रेलियाने ‘रायजिन’ या महासंगणकाचे कॅनबेरा येथे बुधवारी अनावरण करून वेगवान संगणकाच्या शर्यतीमध्ये एक पाऊल पुढे टाकले. जपानच्या पावसाच्या देवतेच्या नावावरून या महासंगणकाला नाव देण्यात आले आहे. या संगणकाच्या निर्मितीसाठी ऑस्ट्रेलियाने तब्बल ४५.२ दशलक्ष अमेरिकन डॉलर खर्च केले आहेत. या संगणकाच्या वार्षिक देखभालीपोटी सुमारे १०.८५ दशलक्ष अमेरिकन डॉलर खर्च होणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या प्रसारण मंडळाने(एबीसी) दिली.
ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय विद्यापीठामध्ये (एएनयू) ‘रायजिन’ या महासंगणकाचे अनावरण करण्यात आले. ‘रायजिन’ची कार्यक्षमता प्रचंड आहे. एएनयूच्या संशोधकांच्यामते ७ अब्ज लोक २० वर्षांमध्ये परिगणकावर(कॅलक्युलेटर) जेवढी आकडेमोड करतील तेवढीच आकडेमोड करण्यासाठी ‘रायजिन’ला फक्त एक तासाचा अवधी पुरेसा ठरतो.
‘रायजिन’ विद्यापीठ परिक्षेत्रामधील राष्ट्रीय संगणकविषयक संरचना सुविधेचा एक भाग आहे. या महाकाय संगणकाचा आकार एखाद्या घरापेक्षा मोठा असल्याचे एएनयूचे शास्त्रज्ञ लिंडसे बॉटन यांनी सांगितले.
‘रायजिन’ला ५७,००० प्रोसेसिंग कोअर्स असून, ती १५,००० सामान्य संगणकाच्या क्षमतेची आहेत. त्याची स्मरणक्षमता (मेमरी) १६० टेराबाईट असून, ती ४०,००० सामान्य संगणकांएवढी आहे. या संगणकाची डिस्क १०,००० सामान्य संगणकांच्या क्षमतेची म्हणजेच १०,००० हजार टेराबाईट आहे”, असे बॉटन म्हणाले.
परदेशांमध्ये जाऊन संशोधन करणाऱ्या हवामान आणि हवामानविषयक अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांना आता बाहेर जाण्याची आवश्यकता नसल्याचे लिंडसे बॉटन यांनी सांगितले. “ऑस्ट्रेलियाने जागतिक संशोधनामध्ये ए़क पाऊल पुढे टाकले असून, ‘रायजिन’च्या निर्मितीमुळे विज्ञान आणि संशोधनाच्या नव्या दिशा मिळाल्या आहेत”, असा आनंद बॉटन यांनी व्यक्त केला.