कोव्हिड १९ प्रतिबंधक लशीतील काही घटकांचे वावडे (अ‍ॅलर्जी) असलेल्या व्यक्तींनी कोव्हिशिल्ड ही लस घेऊ नये, असा सल्ला सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या कंपनीने दिला आहे.

सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने लस कुणी घ्यावी व कुणी घेऊ नये याची माहिती उपलब्ध करून दिली असून ज्या लोकांना कोव्हिशिल्ड लशीतील घटकांचे वावडे असेल त्यांनी ती घेऊ नये असे म्हटले आहे. एल- हिस्टीडाइन, एल-हिस्टीडाइन क्लोराइड मानोहायड्रेट, मॅग्नेशियम क्लोराईड हेक्साहायड्रेट, पॉलीसॉर्बेट ८०, इथॅनॉल, सुक्रोज, सोडियम क्लोराईड, डायसोडियम एडिटेट डायहायड्रेट व पाणी यांचा वापर लशीत केलेला असून त्यापैकी कुठल्याही घटकाचे वावडे असल्यास ती लस घेऊ नये.

सीरमच्या संकेतस्थळावर याबाबतची माहिती दिली असून लस घेणाऱ्यांना नेमकी माहिती व त्यातील जोखीम कळावी, लाभ कळावेत हा त्यामागचा हेतू आहे.

सीरमने म्हटले आहे की, लस घेताना व्यक्तींनी त्यांच्या वैद्यकीय स्थितीची कल्पना कोव्हिशिल्ड लस घेण्यापूर्वी लस देणाऱ्या संस्थांना दिली पाहिजे. जर अ‍ॅनफायलॅक्सिस म्हणजे औषध घटकाचे, अन्न पदार्थाचे किंवा लशीतील घटकाचे वावडे असेल तर त्याची माहिती लसीकरणाआधी देण्याची गरज आहे.

जर अ‍ॅनॅफॅलिक्सिस म्हणजे अ‍ॅलर्जी येण्याची शक्यता असेल तर त्याची कल्पना दिल्याने विपरित परिणाम झाल्याच्या घटना टळू शकतात.

लस घेणाऱ्याने त्याला ताप, प्रतिकारशक्ती अगदीच कमकुवत असणे, रक्ताचे आजार असतील तर त्याची कल्पना देणे गरेजेचे आहे जर एखादी महिला गर्भवती असेल किंवा होणार असेल तर त्यांनी लस घेऊ नये. तुम्हाला आधी दुसरी कुठली कोविड १९ प्रतिबंधक लस दिली असेल तर त्याचीही कल्पना देण्याची गरज आहे.

विपरित परिणामाचे ५८० प्रकार

सरकारने सुरू केलेल्या लशीकरणात सोमवारी पाच वाजेपर्यंत ३ लाख ८१ हजार ३०५ जणांना लस देण्यात आली असून वावडे किंवा वाईट परिणामाचे ५८० प्रकार घडले आहेत. दोन मृत्यूही झाले आहेत पण ते लशीमुळे झाले नसल्याचे शवविच्छेदन अहवालाच्या आधारे नंतर सांगण्यात आले.