विश्व हिंदू परिषदेच्या रविवारपासून सुरू होणाऱ्या अयोध्या यात्रेवर उत्तर प्रदेश शासनाने बंदी घातल्यामुळे सध्या येथील वातावरण तणावपूर्ण झाले आह़े  त्यातच उत्तर प्रदेश शासनाने विहिंपच्या काही नेत्यांना आणि सुमारे ३५०  कार्यकर्त्यांना शनिवारी अटक केल्याने वातावरण अधिकच तंग झाले आह़े
जातीय तणाव वाढण्याचे कारण दाखवून सत्ताधारी समाजवादी पक्षाने यात्रेवर घातलेली बंदी मोडून अयोध्या परिक्रमा पूर्ण करण्याचा निर्धार विहिंपने केल्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेत दोन दिवसांपासूनच प्रचंड वाढ करण्यात आली आह़े  वाराणसीचे विहिंप कार्यालयाचे प्रमुख महंत संतोष दास उपाख्य सथू बाबा यांना शासनाने प्रतिबंधात्मक अटक केली आह़े  तर विहिंपचे वरिष्ठ नेते मंहत राम सरण दास यांना अयोध्येतील राम स्नेही घाट येथे थांबविण्यात आले आह़े
त्याचबरोबर जौनपूर येथून सात, आग्रा येथून ४६, कानपूर येथून ६३, बांदा येथून १, फतेहपूर येथून १७, बस्ती येथून ८ आणि फैझाबाद येथून ६२ जणांना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी लखनऊ येथे दिली़  तसेच अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया आणि रामविलास वेदान्ती यांच्याविरोधात अटक आदेश काढण्यात आले असल्याचे फैझाबाद जिल्हा न्यायदंडाधिकरी विपीनकुमार द्विवेदी यांनी सांगितल़े  जिल्हा प्रशासनाने विहिंपच्या ७० प्रमुख नेत्यांविरोधात अटक आदेश काढले होते. आता आणखी ३०० कार्यकर्त्यांविरुद्ध हे आदेश आहेत़

याचिका फेटाळली
या यात्रेवर घालण्यात आलेल्या बंदीविरोधातील याचिका अलाहबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने शनिवारी फेटाळून लावली़  न्या़  लक्ष्मीकांत महापत्रा आणि न्या़  देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठाकडून स्थानिक वकील महेश गुप्ता यांनी दाखल केलेली ही याचिका फेटाळून लावण्यात आली़  त्यांनी अयोध्या परिक्रमेला परवानगी द्यावी, यासाठी शुक्रवारी ही याचिका दाखल केली होती़

भाजपचा पाठिंबा
या यात्रेला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला आह़े  यात्रेमुळे राज्यात कोणताही तणाव पसरलेला नाही़, तर या यात्रेबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यांमुळेच तणाव निर्माण झाला असल्याचेही भाजपने पाठिंबा देताना म्हटले आह़े  जर या यात्रेबाबत वादग्रस्त विधाने करणे थांबले तर ही यात्रा अतिशय शांततेत संपन्न होईल, असे भाजपच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी म्हटले आह़े