लष्कराच्या जवानांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यावर भाजपने टीका केली होती. या टिकेला प्रत्युत्तर देताना आझम खान यांनी विचित्र प्रतिक्रिया दिली आहे. मी तर भाजपसाठी ‘आयटम गर्ल’ आहे, असं खान म्हणाले आहेत. भाजपनं माझ्यावर निशाणा साधून निवडणुकाही लढवल्या आहेत, असंही ते म्हणाले.

एका कार्यक्रमात आझम खान यांनी लष्करातील जवानांना ‘बलात्कारी’ संबोधले होते. त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीका झाली होती. भाजपनेही त्यांना लक्ष्य केलं होतं. भाजपच्या टिकेला उत्तर देताना त्यांनी स्वतःला भाजपची आयटम गर्ल असल्याचं म्हटलं आहे. भाजपकडं टीका करण्यासाठी दुसरी कोणतीही व्यक्ती नाही. माझ्यावर टीका करून भाजपनं अनेक निवडणुका लढवल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात आलं. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला. लष्कराच्या जवानांबद्दल मी असं बोलूच शकत नाही. मी असे कोणतेही आरोप केलेले नाहीत, असं खान यांनी स्पष्ट केलं आहे.

आझम खान यांनी जवानांबाबत वादग्रस्त टिप्पणी केल्यानंतर त्यांच्यावर भाजपने टीका केली होती. अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्या राजकारण्यांवर बहिष्कारच घातला पाहिजे, असं भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं होतं. तर आझम हे फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांची भाषा बोलू लागले आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजपचे नेते नरसिंह यांनी दिली होती. अशा प्रकारची वक्तव्ये करण्यासाठी समाजवादी पक्ष आपल्या नेत्यांना चिथावणी देतो, असा आरोपही नरसिंह यांनी केला होता. याशिवाय हरियाणाचे मंत्री अनिल वीज यांनीही खान यांच्यावर तिखट शब्दांत प्रहार केला होता. ज्या जवानांवर तुम्ही आरोप करत आहात, तेच सीमेवर पहारा देत असल्यामुळं तुम्ही अद्याप जिवंत आहात हे लक्षात असू द्या, असं वीज म्हणाले होते.