योगगुरू बाबा रामदेव हे सध्या करोनावरील औषधाच्या दाव्यामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी बाबा रामदेव यांच्या पतंजली दिव्या फार्मसीनं कोरोनिल नावाचं औषध बाजारात आणलं. या औषधामुळे करोना पूर्णपणे होतो, असा दावा बाबा रामदेव यांनी केला होता. मात्र, त्यावरून बराच वाद झाला. त्यानंतर बाबा रामदेव यांनी या औषधाच्या विक्रीला राष्ट्रीय आरोग्य संशोधन परिषदेनं परवानगी दिल्याचं म्हटलं आहे. त्यावरून राजस्थानचे आरोग्यमंत्री डॉ. रघू शर्मा यांनी बाबा रामदेव यांना हे औषध मोफत वाटण्याची सूचना केली आहे.

बाबा रामदेव यांनी पतंजली दिव्या फार्मसीनं करोनावर औषध बनवल्याचा दावा केला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी हे औषध बाजारात आणण्यात आलं. मात्र, केंद्रीय आयुष मंत्रालयानं औषधाच्या जाहिरात व विक्री बंदी आणली. औषधाची चाचणी झाल्यानंतर रोग प्रतिकारक शक्ती वाढणार औषध त्याची विक्री करण्यास परवानगी दिली. मात्र, कोरोनिल करोनावरील औषध नसल्याचंही सांगितलं.

यासंदर्भात राजस्थानचे आरोग्यमंत्री डॉ. रघू शर्मा म्हणाले, “बाबा रामदेव यांनी असा दावा केला आहे की, त्यांनी बनवलेल्या औषधाला राष्ट्रीय आरोग्य संशोधन परिषदेचं प्रमाणपत्र मिळालं आहे. जर बाबा रामदेव यांचा दावा खरा असेल, तर त्यांनी या औषधाची विक्री करू नये. लोकांना ते मोफत वाटावं,” असं शर्मा यांनी म्हटलं आहे.

पतंजलीनं भूमिकेवरून केलं होत घुमजाव

पतंजलीनं करोनावरील कोरोनिल हे औषध बाजारात आणल्यानंतर उत्तराखंड आयुर्वेद विभाग खडबडून जागा झाला. त्यानंतर पतंजलीनं असं काही औषध बनवण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचं या विभागाच्या परवाना अधिकाऱ्यानं सांगितलं. ताप, खोकला व प्रतिकारक शक्ती वाढण्याचं औषध तयार करण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचं या अधिकाऱ्यानं म्हटलं होतं. त्यानंतर तशी नोटीस पतंजलीला देण्यात आली. त्यावर आम्ही करोनावर औषध बनवलं नसल्याचं पतंजलीनं म्हटलं होतं.