कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांसह विरोधी पक्षांतील इतर नेत्यांनी केलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्याची मागणी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी फेटाळून लावली आहे. मतपत्रिका वापरण्याच्या जुन्या पद्धतीकडे परत वळण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ममता बॅनर्जी यांच्यासह तेलुगू देशम पार्टीचे एन. चंद्राबाबू नायडू, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आदींनी मतदान यंत्रांऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी अनेकदा केली आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमधील तपशिलात फेरफार करणे शक्य आहे. त्यामुळे पुन्हा मतपत्रिकांचा वापर करणे सुरू करावे, असे या नेत्यांचे म्हणणे आहे.    याबाबत अरोरा यांनी सांगितले की, ‘‘मतपत्रिकांचा वापर करण्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकाल याआधीच दिले आहेत. मतपत्रिकाद्वारे मतदान ही आता कालबाह्य़ बाब आहे, असे न्यायालयाने अनेकदा म्हटले आहे. त्यामुळे मतपत्रिकांच्या वापराच्या काळाकडे आम्ही पुन्हा जाणार नाही.’’ न्यायवैद्यक विद्यापीठ आणि ‘आयआयएम’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठी ते येथे आले होते.

काश्मीरमधील निवडणुकीबाबत सूचनांची प्रतीक्षा

मुख्य निवडणूक आयुक्त अरोरा यांचे येथील सुभाषचंद्र बोस विमानतळावर आगमन झाले असता त्यांनी सांगितले की, काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याबाबत आम्ही गृह व कायदा मंत्रालयाकडून सूचना मिळण्याची वाट पाहात आहोत.