बँकॉकच्या मध्यवर्ती भागांत असलेल्या हिंदूधर्मीयांच्या एका प्रार्थनास्थळाबाहेर मोटरसायकलवर ठेवण्यात आलेल्या एका शक्तिशाली बॉम्बचा स्फोट होऊन त्यामध्ये किमान २७ जण ठार तर ८० जण जखमी झाले आहेत, असे पोलीस आणि मदतकार्य पथकातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.
चिडलोम जिल्ह्य़ातील इरावान प्रार्थनास्थळाबाहेर सायंकाळी हा स्फोट झाला. थायलंड टेलिव्हिजनने १५ जण ठार झाल्याचे सांगितले असले तरी काही जणांनी किमान २७ जण बळी पडल्याचा दावा केला आहे. बँकॉकमध्ये वर्दळीच्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे मंदिर असून त्याच्या बाजूला तीन मोठे शॉपिंग मॉल आहेत. हे ठिकाण बँकॉकमधील मोठी बाजारपेठ मानले जाते.
स्फोट होताच या ठिकाणी एकाच हाहाकार उडाला. मानवी शरीराचे तुकडे इतस्तत: विखुरलेले दिसत होते, असे एका वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने सांगितले. या स्फोटाची जबाबदारी त्वरित कोणीही स्वीकारलेली नाही. देशाच्या दक्षिणेकडील भागांत मुस्लीम घुसखोरी करीत असून थायलंडचे सौनिक त्याविरोधात लढत आहेत. बँकॉकमध्ये बॉम्बहल्ले होण्याचे प्रकार दुर्मीळ आहेत.
इरावान प्रार्थनास्थळाजवळ कायम वर्दळ असते, आलिशान हॉटेल, शॉपिंग सेंटर असा परिसर असलेले हे प्रार्थनास्थळ पर्यटकांचे आकर्षण आहे. पूर्व आशियातून मुख्यत्वे येथे पर्यटक येतात. थायलंडमधील काही नागरिकही येथे प्रार्थना करतात. त्यामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो.
घटनेची खबर मिळताच पोलीस, मदतकार्य पथक, बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी रवाना झाले असून आणखी बॉम्ब ठेवण्यात आले आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.
bangkok-blast-emb2