प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत दौऱयावर येण्यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी पाकिस्तानाला कडक शब्दांत तंबी दिली आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांची सुरक्षित आश्रयस्थाने कदापि सहन केली जाणार नाहीत, असे सुनावत ओबामा यांनी मुंबई हल्ल्यामागील दोषींना शिक्षा झालीच पाहिजे, असे म्हटले आहे.
‘इंडिया टुडे’ नियतकालिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ओबामा यांनी भारत आणि अमेरिकेतील मैत्रीपूर्ण संबंधांवरही भाष्य केले. भारत अमेरिकेचा सच्चा मित्र असल्याचेही त्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले. ओबामा येत्या रविवारी तीन दिवसांच्या भारत दौऱयावर येत आहेत. प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत होणाऱया संचलनामध्ये ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष पहिल्यांदाच या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहात आहेत. त्यामुळे यंदाचा संचलन सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ओबामा यांनी पाकिस्तानला समज दिली.
ते म्हणाले, दहशतवादाचा बिमोड करण्याच्या मुद्द्यावर अमेरिका पाकिस्तानसोबत काम करीत असला, तरी तेथील दहशतवाद्यांची सुरक्षित आश्रयस्थाने कदापि स्वीकारण्यासारखी नाहीत. त्याचबरोबर मुंबईवर २६/११ला ज्यांनी दहशतवादी हल्ला घडवून आणला, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. दहशतवादाविरोधातील लढ्यात अमेरिका आणि भारत एकत्रितपणे लढतील, अशी ग्वाही अमेरिकेचा अध्यक्ष या नात्याने आपण देतो, असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर दोन्ही देशांमधील संबंधांचा नवा अध्याय सुरू झाल्याचे वर्णन ओबामा यांनी केले. यामुळे द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर नेता येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.