देशात सध्या करोनाबाधितांच्या संख्येचा आलेख कमी होत असला तरी धोका मात्र टळलेला नाही. आशतच करोनावरील लस विकसित करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. भारतात भारत बायोटेक आयसीएमआरसोबत एकत्र येऊन करोनावरील लस विकसित करत आहे. काही दिवसांपूर्वी या लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली होती. त्यानंतर आता भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात करण्यात आली आहे. भारत बायोटेकनं ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

कंपनीनं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील करोना लसीची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली असल्याची माहिती मागील महिन्यात भारत बायोटेककडून देण्यात आली होती. दरम्यान, आता २६ हजार स्वयंसेवकांवर या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू करण्यात आल्याचंही भारत बायोटेकनं म्हटलं आहे. यासंदर्भात बेवसाईटची एक लिंकही भारत बायोटेकनं शेअर केली आहे. कंपनीनं ऑक्टोबर महिन्यात डीजीसीआयकडे लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मागितली होती.

अमेरिकन कंपनीचाही दावा

करोनावर प्रभावी लस शोधल्याचा दावा अमेरिकेतील मॉडर्ना या फार्मा कंपनीने केला आहे. ही कंपनी तयार करत असलेली लस ९४.५ टक्के प्रभावी असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. लेट-स्टेज क्लिनिकल ट्रायलच्या सुरुवातीच्या डेटाच्या आधारावर कंपनीने हा दावा केला आहे. एकाच आठवड्यात लसीच्या चांगल्या कामगिरीचा दावा करणारी मॉडर्ना ही दुसरी अमेरिकन कंपनी आहे.

यापूर्वी फाइजर या कंपनीने दावा केला होता की, ते तयार करीत असलेली लस ९० टक्के प्रभावी ठरली आहे. या दोन्ही लशींच्या यशस्वीतेचा जो दावा केला जात आहे तो अपेक्षापेक्षा अधिक चांगला आहे. आजवर बहुतेक तज्ज्ञ मंडळी लसींच्या ५० ते ६० टक्के यशाबाबत सांगत आले आहेत. मात्र, लसीचं वितरण सुरु करण्यापूर्वी आणखी सुरक्षित डेटाची गरज पडणार आहे. सुरक्षित डेटा समोर आल्यानंतर नियामक मडंळाकडून मंजुरी मिळाली तर अमेरिकेत डिसेंबरपर्यंत दोन करोना लसींचा वापर आपात्कालिन परिस्थितीत केला जाऊ शकतो.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेत वर्षाच्या अखेरीस ६ कोटी डोस उपलब्ध होऊ शकतात. तर पुढील वर्षापर्यंत या दोन्ही लसींचे १०० कोटी डोस अमेरिकेजवळ असू शकतात जी त्यांच्या गरजेपेक्षा अधिक असेल. अमेरिकेची लोकसंख्या सुमारे ३३ कोटी आहे.