भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पलायन केलेल्या सिमीच्या (स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) आठ दहशतवाद्यांना मध्यप्रदेश पोलिसांनी अवघ्या काही तासात कंठस्नान घातले. परंतु त्यांच्या या कारवाईवर आता एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केल्यानेच प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात त्यांचा खात्मा झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. परंतु घटनास्थळी बनवलेल्या एका व्हिडिओत एक पोलीस कर्मचारी सिमी दहशतवाद्याच्या शर्टाखाली ठेवलेला चाकू काढताना दिसतो. तो चाकू पाहून त्याने पुन्हा तो ठेवताना व्हिडिओत दिसतो. हे दहशतवादी तुरूंगातून फरार झालेल्या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून होणार आहे. हे दहशतवादी तुरूंगातून पळून गेल्यानंतर मध्यप्रदेश सरकारने पाच अधिकाऱ्या निलंबित केले आहे. यात तुरूंग अधिक्षकांचाही समावेश आहे. पोलीस महासंचालक योगेश चौधरी यांनी या कैद्यांकडे हत्यार होते. पोलीस त्यांना पकडण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी पोलिसांवरच गोळीबार सुरू केला होता अशी माहिती माध्यमांना दिली.


तत्पूर्वी पहाटे दोन ते तीनच्या सुमारास ही घटना घडली. कारागृहाच्या बी ब्लॉकमध्ये दहशतवाद्यांना ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांनी बराक तोडून मुख्य सुरक्षारक्षक रमाशंकर आणि अन्य एका चाकुने सुरक्षारक्षकावर हल्ला चढवला. यामध्ये रमाशंकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर कारागृहाची भिंत ओलांडण्यासाठी दहशतवाद्यांनी चादरीच्या सहाय्याने बनवलेल्या दोराचा वापर केला. या दोराच्या सहाय्याने हे सर्व दहशतवादी भिंतीवर चढले आणि ते पसार झाले. मोहम्मद खालीद, जाकिर हुसैन सादिक, अकील खिलची, मुजीब शेख, माजिद, सलीम, महबूब आणि अमजद अशी पसार दहशतवाद्यांची नावे आहेत.