अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यास एच१बी व्हिसावर घातलेली तात्पुरती स्थगिती आपण उठविणार असल्याचे डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार आणि अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे.

भारतीय माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावयासिकांच्या दृष्टिकोनातून एच१बी या व्हिसाला महत्त्व आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने २३ जून रोजी एच१बी आणि अन्य व्हिसांना तात्पुरती स्थगिती दिली होती. बायडेन यांनी एच१बी व्हिसाधारकांच्या सहभागाचे कौतुक केले आहे.

ट्रम्प यांनी वर्षअखेपर्यंत एच१बी व्हिसा संपुष्टात आणला, मात्र आपल्या प्रशासनाची ती भूमिका नसेल, कंपनी व्हिसावर असलेल्या लोकांनी हा देश उभारला आहे, असे बायडेन म्हणाले.

भारताशी संबंध दृढ करण्यास प्राधान्य

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला विजय झाल्यास अमेरिकेचा नैसर्गिक मित्र देश असलेल्या भारतासमवेतच्या रणनीतीपूर्ण संबंधांना आपल्या प्रशासनाचे प्राधान्य असेल, असे जो बायडेन यांनी म्हटले आहे. अमेरिका आणि भारत हे नैसर्गिक मित्र देश आहेत, ही मैत्री रणनीतीपूर्ण असून ती आमच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, अमेरिका-भारत नागरी अणुकरारामध्ये आपण महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि तो मोठा करार होता, असेही बायडेन म्हणाले.