देशातील करोनाचा रुग्णआलेख उतरणीला लागला असून, मृत्युदरातही घट नोंदविण्यात आली आहे. एका दिवसातील नवी रुग्णसंख्या पुन्हा ५० हजारांखाली आली, तर १०८ दिवसांनंतर मृतांचा आकडा प्रथमच ५००च्या खाली घसरला. एकूण करोनाबळींचे प्रमाण दीड टक्क्यांवर आले असून, ही २२ मार्चनंतरची सर्वात मोठी घट आहे.

गेल्या २४ तासांत ४५,१४८ नवे रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या ७९,०९,९५९ वर, तर एक दिवसात ४८० रुग्ण दगावल्याने मृतांची संख्या १,१९,०१४ वर पोहोचली आहे. करोना संसर्गातून आतापर्यंत ७१,३७,२२८ रुग्ण बरे झाल्याने हा दर ९०.२३  टक्क्यांवर गेला आहे.

उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या सलग चार दिवस ७ लाखांच्या खाली आहे. सध्या ६,५३,७१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हे प्रमाण एकूण बाधितांच्या ८.२६ टक्के असल्याचे आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले.

देशातील करोना बाधितांची संख्या ७ ऑगस्टला २० लाखांपलीकडे, २३ ऑगस्टला ३० लाखांपलीकडे आणि ५ सप्टेंबरला ४० लाखांपलीकडे पोहोचली होती. त्यानंतर १६ सप्टेंबरला रुग्णसंख्या ५० लाखांहून अधिक, २८ सप्टेंबरला ६० लाख आणि ११ ऑक्टोबरला ७० लाखांहून जास्त होती.

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) माहितीनुसार २४ ऑक्टोबपर्यंत १० कोटी ३४ लाख ६२ हजार ७७८ चाचण्या करण्यात आल्या, तर रविवारी केलेल्या चाचण्यांची संख्या ९,३९,३०९ आहे.

सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात 

– देशातील आतापर्यंतच्या एक लाख १९ हजार १४ करोनाबळींमध्ये महाराष्ट्रातील मृतांची संख्या सर्वाधिक, आहे. त्यापाठोपाठ तमिळनाडूत १०,९२४ रुग्ण दगावले आहेत.

– कर्नाटकात १०,९०५, उत्तर प्रदेशात ६,८८२, आंध्र प्रदेशात ६,५८७, पश्चिम बंगाल ६,४८७, दिल्ली ६,२५८, पंजाब ४,११७ आणि गुजरातमध्ये ३,६८६ रुग्णांचा करोनाने बळी घेतला आहे.

राज्यात चार महिन्यानंतरची सर्वात कमी रुग्णवाढ

मुंबई : राज्यातही करोनाची रुग्णसंख्या घटू लागली आहे. राज्यात सोमवारी करोनाचे ३,६३४ रुग्ण आढळले. जूनअखेरनंतरची ही दिवसभरातील सर्वात कमी रुग्णवाढ आहे. राज्यात दिवसभरात ९,९०५ रुग्ण करोनामुक्त झाले. एकूण करोनामुक्त रुग्णांचे हे प्रमाण ८९.०२ आहे. विशेष म्हणजे एकेकाळी सर्वाधिक रुग्ण्वाढ नोंदविल्या जाणाऱ्या पुण्यात देशातील सर्वात जास्त करोनामुक्त आहेत. पुणे शहरात करोनामुक्तांचे प्रमाण ९३.२१ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत एकूण १४ लाख ७० हजार ६६० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्यभरात सोमवारी करोनाने ८४ जणांचा बळी घेतला. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत करोनाबळींचा हा आकडाही घटला आहे.

चाचणी ९८० रुपयांत

मुंबई :  राज्यात करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या व्हाव्यात यासाठी खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या करोना चाचणीचे दर आणखी २०० रुपयांनी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार आता के वळ ९८० रुपयांमध्ये कोणत्याही खासगी प्रयोगशाळेत जाऊन करोनाची चाचणी करता येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिली.