मला खरेदी करू शकेल, अशी एकही टाकसाळ अस्तित्वात नाही, असे वक्तव्य बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले. सृजन घोटाळ्याप्रकरणी संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले. हा घोटाळा मी उजेडात आणला आणि आर्थिक गुन्हे शाखेला याची चौकशी करण्याचे आदेश दिले. नंतर या प्रकरणात अनेक बँकही सहभाग असल्याचे लक्षात आल्यानंतर याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. सीबीआय तपासाची अधिसूचना जारी झाली आहे. येत्या दोन दिवसांत याप्रकरणी तपासही सुरू होईल, अशी माहिती त्यांनी या वेळी दिली.

आपल्यावरील आरोपांबाबत बोलताना ते म्हणाले, लोक हताश होऊन माझ्यावर काहीही आरोप करत आहेत. यांच्या आरोपात काहीच दम नाही. व्यवस्थेत अनेक त्रृटी आहेत. त्याचाच फायदा घोटाळेबाज घेत आहेत. पण आता अचूक व्यवस्था केली जाईल की पुन्हा अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्तीच होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वर्ष २००३ पासून हा घोटाळा सुरू होता, असा आरोप त्यांनी राबडीदेवी यांचे नाव न घेता केला.

याचदरम्यान राबडीदेवी यांनी या घोटाळ्यातील काही साक्षीदारांना जिवे मारण्यात येत असल्याचा आरोप केला. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्या म्हणाल्या. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवानंद तिवारी यांनीही सृजन घोटाळा सत्ताधीशांच्या संरक्षणात सुरू होता, असा आरोप केला. ते म्हणाले की, २००८ आणि २०१३ असे दोन वेळा हा घोटाळा उजेडात आला होता. पण तेव्हाही हे प्रकरण दाबण्यात आले होते. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सृजन घोटाळ्याचा मुद्दा गाजणार आहे. परंतु, गोंधळामुळे अजून याविषयावर चर्चा झालेली नाही.

[jwplayer fP09Fw8O-1o30kmL6]