बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान शनिवार पार पडलं. त्यानंतर आता १० नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. दरम्यान, विविध संस्थांनी केलेल्या मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) कल जाहीर होत आहेत. या एक्झिट पोलनुसार बिहारच्या जनतेने राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्या महागठबंधनकडे सत्ता सोपवण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. यामध्ये राजद हा सर्वात मोठा पक्ष तर भाजपा दुसरा सर्वाधिक मतं मिळवणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये २४३ जागांसाठी शनिवारी तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडलं. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी १२२ ही मॅजिक फिगर आहे. दरम्यान, एक्झिट पोलनुसार कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता काबीज करता येणार नाही. मात्र, भाजपा-जदयूच्या एनडीए आणि राजद-काँग्रेसच्या महागठबंधनमध्ये चुरशीची लढत होईल. तरी यामध्ये महागठबंधनचं पारडं जड राहण्याची शक्यता आहे.

१) एबीपी-सी वोटरच्या सर्वेनुसार

एनडीएला १०४ ते १२८ जागा मिळू शकतील. तर महागठबंधनला १०८ ते १३१ जागा मिळतील असा अंदाज आहे. त्याचबरोबर भाजपाला ६६ ते ७४, जदयूला ३८ ते ४६, राजदला ८१-८९, काँग्रेसला २१-२९, लोजपाला १-३ आणि अन्य पक्षांना ६-२३ जागा मिळतील असा अंदाज आहे.

२) रिपब्लिक भारत जन की बातच्या सर्वेनुसार

भाजपा-जदयूला (एनडीए) ९१-११७ तर राजद-काँग्रेसला (महागठबंधन) ११८-१३८ जागा मिळतील. तसेच लोजपाला ५-८ आणि अन्य पक्षांना ३ ते ६ जागा मिळतील.

३) टाइम्स नाऊ-सी वोटरच्या सर्वेनुसार

एनडीएला ११६ तर महागठबंधनला १२० जागा मिळतील. तर लोजपाला १ आणि अन्य पक्षांना ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती

इंडिया टीव्ही अॅक्सिस पोलच्या सर्वेनुसार, राजदचे सर्वात प्राध्यान्यक्रम असलेले उमेदवार आणि लालू प्रसाद यादव यांचे पुत्र ३१ वर्षीय तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी सर्वाधिक जनता उत्सुक आहे. यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव (राजद) – ४४ टक्के, नितीश कुमार (जदयू) – ३५ टक्के तर चिराग पासवान (लोजपा) – ७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.