बिहारमधील अल्पसंख्याक जनतेचे प्रतिनिधित्व करणा-या नेत्यांनी ‘माय नेम इज खान’चे प्रचारतंत्र वापरण्यास सुरूवात केली आहे. इंडियन मुजाहिद्दीन आणि आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेशी लागेबांधे असल्याच्या कारणावरून टीकेच्या भोव-यात अडकलेले बिहार राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री शाहीद अली खान यांनी आपले देशप्रेम सिद्ध करण्यासाठी नवी शक्कल लढविली आहे. सिनेकलावंत शाहरुख खान याच्या ‘माय नेम इज खान’ चित्रपटातील संवादाचा आधार घेत ‘माय नेम इज शाहीद खान, बट आय अॅम नॉट टेररिस्ट’ असे सांगत आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी प्रचार सुरू केला आहे. इंडियन मुजाहिद्दीनच्या हस्तकांशी संबंध असल्याच्या संशयावरून शाहीद खान हे सध्या सीमा सुरक्षा दलाच्या रडारवर आहेत. शाहीद खान यांनी मात्र आपल्या संपर्कात असलेल्या व्यक्ती कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबधित नसल्याचे सांगत आपल्यावरील आरोप निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे.