22 April 2019

News Flash

भाजपाचं जुमलेबाज इन्फोग्राफिक, काँग्रेसनं उघड केला बुद्धीभेद

भाजपाच्या काळात झालेली दरवाढ काँग्रेसच्या काळातल्या दरवाढीपेक्षा टक्क्यांमध्ये कमीच असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला

पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात भाजपा सरकारवर देशभरात प्रचंड टिका होत आहे. असं असतानाही भारतीय जनता पार्टीने मात्र दोन इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून भाजपाच्या काळात झालेली दरवाढ काँग्रेसच्या काळातल्या दरवाढीपेक्षा टक्क्यांमध्ये कमीच असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपाची ही जुमलेबाजी काँग्रेसने अवघ्या काही तासांमध्येच उघड केली आणि भाजपाला तोंडघशी पाडलं. भाजपाने सोयीस्कररीत्या पेट्रोल व डिझेलच्या विविध काळांमधली भाववाढीची टक्केवारी दाखवताना आंतरराष्ट्रीय बाजारातील तत्कालिन कच्च्या तेलाचे भाव दाखवले नाहीत, आणि भाजपाच्या काळात झालेली दरवाढ कमीच असल्याचा आव आणला.

काँग्रेसने भाजपाच्याच इन्फोग्राफिक्सचा आधार घेत क्रूड ऑइलचेही भाव दाखवले आणि भाजपानं अर्धवट माहिती देऊन कसी जुमलेबाजी केली हे उघड केले. भाजपावर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टिका केली असून भाजपाची ही दोन्ही इन्फोग्राफिक्स चांगलीच ट्रोल झाली आहेत. विशेष म्हणजे इंधन तेलाच्या दरवाढीविरोधात विरोधकांनी सोमवारी भारत बंद पुकारला होता, याच दिवसाचे औचित्य साधत भाजपानं ही इन्फोग्राफिक्स ट्विट केली होती. भाजपानं २००४ ते २०१८ या कालावधीत दिल्लीमध्ये पेट्रोल व डिझेलचे भाव कसे वाढले याचा हा ग्राफ दिला व त्याला “ट्रूथ ऑफ हाइक इन पेट्रोलियम प्राइसेस” असं शीर्षक दिलं.

विशेष म्हणजे भाजपाच्या काळात पेट्रोल व डिझेलचे भाव घसरल्याचे दाखवणारा जुमला भाजपानं केला, वस्तुत: भाव वाढल्याचे त्यांनी दाखवायला हवे होते. मात्र, काँग्रेसच्या काळात जितक्या प्रमाणात भाव वाढले तितक्या प्रमाणात भाजपाच्या काळात भाव वाढले नसल्याचे अवसान भाजपानं आणलं. परंतु या काळातल्या कच्च्या तेलाच्या भावांवर मात्र सोयीस्कररीत्या मौन बाळगलं.