पुलवामा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत मेरठ येथे राहणारे लष्कर जवान अजय कुमार शहीद झाले. मंगळवारी गाजियाबाद येथील निवाडी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शेवटचा निरोप देताना उपस्थित लोक भावूक झालेले यावेळी पहायला मिळालं. अखेरचा निरोप देताना काही नेतेदेखील उपस्थित होते. मात्र भाजपा नेत्यांच्या एका कृत्यामुळे त्यांना लोकांच्या रागाला सामोरं जावं लागलं. केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह अखेरचा निरोप देताना अनेकदा हसताना दिसले. इतकंच नाही तर अंत्यसंस्कारासाठी बूट घालून ते पोहोचले होते.

मंगळवारी शहीद जवाना अजय कुमार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह, उत्तर प्रदेशमधली नेता सिद्धार्थ नाथ सिंह, मेरठ भाजपा खासदार राजेंद्र अग्रवाल यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. अंत्यसंस्काराच्या ठिकाणी बूट घालून आल्याने यावेळी ग्रामस्थ आणि भडकलेल्या लोकांनी नेत्यांना चांगलंच सुनावलं.

अंत्यसंस्कार सुरु असताना अनेक वेळा सत्यपाल सिंह हसताना दिसत होते. यामुळेही लोक नाराज झाले होते. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोकांचा झालेला उद्रेक पाहून मंत्र्यांनी लगेच आपल्या पायातील बूट काढले आणि पुन्हा आपल्या जागी येऊन बसले. यावेळी हा सर्व प्रकार उपस्थितांनी मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. लोकांमुळे नेत्यांची चांगलीच कोंडी झाल्याचं व्हिडीओत पहायला मिळत आहे.

पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाल्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं होतं. यावेळी दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत मेजरसिहत चार जवान शहीद झाले होते. जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केलं होतं.