पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. निवडणुकांच्या तारखा जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत त्याप्रमाणे राजकीय नेत्यांसोबत मतदारांमध्येही उत्साह आणि तणाव निर्माण होत आहे. दरम्यान मतदारदेखील बदल व्हावा यासाठी आग्रही असल्याचं दिसत आहे. एबीपी न्यूज आणि सी वोटर्सने केलेल्या सर्वेक्षणात दावा करण्यात आला आहे की, जर आजच्या तारखेला विधानसभा निवडणुका झाल्या तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपाचा पराभव होईल. तसंच छत्तीसगडमध्येही हाती निराशा लागण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेश:
सर्वेक्षणानुसार, मध्य प्रदेशातील 230 जागांपैकी 119 जागा काँग्रेसला मिळू शकतात. याचा अर्थ बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या 116 जागांच्या तुलनेत काँग्रेसला तीन जागा जास्त मिळतील. दुसरीकडे राज्यात चौथ्यांदा सत्तेवर येण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपाला 105 जागांवरच समाधान मानावं लागेल. इतरांच्या खात्यात सहा जागा जातील. मध्य प्रदेशात आजच्या तारखेला निवडणूक झाली तर काँग्रेसला जास्त मतदान होईल अस सर्व्हेत दिसत आहे. काँग्रेसला एकूण 43, भाजपाला 42 आणि इतर पक्षांना 15 टक्के मतं मिळतील.

राजस्थान:
येथे विधानसभेच्या एकूण 200 जागांसाठी निवडणूक होणार आहे. सर्वेक्षणानुसार, आज निवडणूक होण्याच्या परिस्थितीत काँग्रेस अत्यंत दमदार पुनरागमन करण्याची शक्यता आहे. काँग्रेसला सर्वात जास्त 144 जागांवर विजय मिळू शकतो तर भाजपाच्या खात्यात फक्त 55 जागा जाण्याची शक्यता आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून येईल. मतदान टक्केवारीबद्दल बोलायचं झाल्यास काँग्रेसला 49, भाजपाला 37 आणि इतरांना 14 टक्के मतदान होऊ शकतं. राज्यात सध्या वसुंधरा राजे यांच्याविरोधात वारे वाहत असून भाजपादेखील अनेक आमदारांचं तिकीट कापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

छत्तीसगड:
येथे एकूण 90 जागांसाठी मतदान होणार आहे. सर्वेक्षणानुसार, राज्यात भाजपाची स्थिती त्यांना अपेक्षा आहे तितकी चांगली दिसत नाही आहे. भाजपा गेल्या 15 वर्षांपासून राज्यात सत्तेवर असून चौथा कार्यकाळ सुरु होईल अशी अपेक्षा करत आहे. मात्र सर्व्हेक्षणात दावा करण्यात आला आहे की, भाजपा 43, काँग्रेस 42 आणि इतर पक्षांना 5 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. याचा अर्थ बहुमतासाठी आवश्यक 46 जागा ना भाजपाला मिळत आहेत, ना काँग्रेसला.
जर अशी परिस्थिती झाली तर भाजपा आणि काँग्रेसला अपक्ष उमेदवारांची मदत घेऊन सरकार स्थापन करावं लागले. सर्व्हैनुसार, टक्केवारीनुसार भाजपाला 40.1, काँग्रेसला 40 आणि इतरांना 19.9 मतदान होईल.