दिल्लीच्या प्रदूषणावरील बैठकीला गैरहजर राहिल्याने ट्रोल झालेले माजी भारतीय क्रिकेटर आणि भाजपा खासदार गौतम गंभीर यांनी माझ्या जिलेबी खाण्याने दिल्लीचं प्रदूषण कमी होणार असेन तर कायमचं जिलेबी खाणं सोडून देईन अशी प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणावर बोलावण्यात आलेल्या बैठकीला गौतम गंभीर गैरहजर राहिल्याने टीकेचे धनी झाले होते. व्ही व्ही एस लक्ष्मण आणि निवेदक जतिन सप्रू यांच्यासोबत इंदूरमध्ये जिलेबीवर ताव मारतानाचा त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर आम आदमी पक्षाने त्यांचे फोटो शेअर करत टीका आणि ट्रोल करण्यास सुरुवात केली होती.

गौतम गंभीर यांनी आम आदमी पक्षाकडून करण्यात आलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. “गेल्या पाच महिन्यात मी दिल्लीच्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी खूप काम केलं आहे. आम आदमी पक्ष वगळता दिल्लीच्या प्रदूषणाबाबत प्रत्येक नागरिक गंभीर आहे. अरविंद केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षात काय काम केलं आहे त्यांना विचारा,” असं गौतम गंभीर यांनी म्हटलं आहे.

यावेळी त्यांना बैठकीला गैरहजर होतात असं विचारण्यात आलं असता, “बैठक महत्त्वाची की केलेलं काम महत्त्वाचं आहे,” अशी विचारणा त्यांनी केली. बैठकीचा मेल आला होता तेव्हाच त्यांना आपल्या बीसीसीआयसोबत असलेल्या कराराबाबत कल्पना देण्यात आली होती अशी माहिती गौतम गंभीर यांनी दिली.

“आम आदमी पक्षाकडून मला १० मिनिटांत ट्रोल करण्यास सुरुवात करण्यात आली होती. इतकी मेहनत प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी केली असती तर आज आपण स्वच्छ हवेत जगत असतो,” असा टोला यावेली त्यांनी लगावला.

काय आहे प्रकरण ?
दिल्लीमध्ये प्रदूषणाची गंभीर समस्या असून यासंबंधी संसदेच्या शहर विकास स्थायी समितीची बैठक बोलावण्यात आली होती. गौतम गंभीर शहर विकासासाठी तयार करण्यात आलेल्या संसदेच्या स्थायी समितीचे सदस्य आहेत. या समितीचे दिल्लीचे ते एकमेव सदस्य आहेत. या बैठकीत समितीचे सदस्य आणि अधिकारी उपस्थित राहणं अपेक्षित होते. मात्र या बैठकीला ३० पैकी फक्त पाच सदस्यच उपस्थित होते. गौतम गंभीर त्यावेळी इंदूर येथील भारत विरुद्ध बांगलादेशच्या कसोटी सामन्यात समालोचन करण्यात व्यस्त होते. त्यामुळे ते बैठकीला गैरहजर होते.

गौतम गंभीर अनुपस्थित राहिल्याने आम आदमी पक्षाने त्यांच्यावर निशाणा साधला. आम आदमी पक्षाने ट्विटरवर गौतम गंभीर यांचा जिलेबी खातानाचा फोटो शेअर केला. आम आदमी पक्षाने गौतम गंभीर यांच्यावर प्रदूषणाचं राजकारण केल्याचा आरोप केला आहे.

आम आदमी पक्षाने ट्विटमध्ये लिहिलं होतं की, “दिल्ली प्रदूषणामुळे सध्या त्रस्त आहे आणि गौतम गंभीर इंदूरमध्ये मस्ती करण्यात व्यस्त आहेत. खासदारांनी दिल्लीत आलं पाहिजे आणि हवा प्रदूषणावर होणाऱ्या बैठकीत सहभागी झालं पाहिजे. ही बैठक रद्द करण्यात आली कारण, एमसीडी, डीडीए, पर्यावरण मंत्रालय आणि दिल्लीतील खासदार गैरहजर राहिले”.

यावेळी आम आदमी पक्षाने गौतम गंभीर यांचं एक जुनं ट्विट रिट्विट करत त्यांच्यावर निशाणा साधला. १ नोव्हेंर रोजी गौतम गंभीर यांनी हे ट्विट केलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, “दिल्ली त्रस्त असताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पत्रकार परिषद करण्यात व्यस्त आहेत. मुख्यमंत्र्यांनी बांधकाम सुरु असलेल्या किती जागा झाकण्यात आल्या आहेत हे पाहिलं पाहिजे”.

दरम्यान, बैठकीला वरिष्ठ अधिकारी गैरहजर राहिल्याने काही मिनिटातच बैठक रद्द करण्यात आली. ही स्थायी समितीची पहिली बैठक होती. समितीत एकूण ३० सदस्य असून फक्त पाच जण उपस्थित होते.